अमेरिकेने पुरावे दिले हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करु – पाकिस्तान

इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे, की अमेरिकेने पुरावे दिले तर आम्ही त्यांच्यासोबत मिळून हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करु. त्यासाठी अमेरिका-पाकिस्तान संयुक्त कारवाई करेल.

ख्वाजा आसिफ नुकतेच वॉशिंग्टनला गेले होते. तिथे त्यांनी ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आसिफ यांनी एक्स्प्रेस न्यूजसोबत बोलताना सांगितले, ‘आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटले आहे की त्यांनी पाकिस्तानात यावे आणि हक्कानी नेटवर्कला मदत केली जात असल्याचे पुरावे द्यावे. जर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना हक्कानी नेटवर्कचे काही पुरावे आढळले तर पाकिस्तानी सैनिक या नेटवर्कविरोधात अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करतील.’

US परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री येणार पाकिस्तानला
– ख्वाजा आसिफ यांनी हे देखील स्पष्ट केले की पाकिस्तानी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांनी अशीच ऑफर काबुल दौऱ्या दरम्यान अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनाही दिली होती.

– काही दिवसांपूर्वी अशी माहिती होती, की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन आणि संरक्षण मंत्री जीम मॅटिस हे याच महिन्यात पाक दौऱ्यावर येणार आहेत.
– ट्रम्प सरकारमधील हे दोन मंत्री दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानला कडक संदेश देतील अशी चर्चा आहे.

काय आहे हक्कानी नेटवर्क ?
– हक्कानी नेटवर्क ही एक दहशतवादी संघटना आहे. अफगाणिस्तानात ते अमेरिकेच्या विरोधात काम करतात. या गटाने गेल्या काही वर्षांमध्ये अपहरण, हल्ले अशा अनेक कारवाया केल्या आहेत.  या नेटवर्कने अफगाणिस्तानमध्ये भारताविरोधातही कारवाया केल्या होत्या.

पनवेलमध्ये डबल मर्डर !

नवी मुंबई – पनवेलमध्ये तलवारीनं वार करुन दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  अज्ञातांनी  घरात घुसून सासू-सुनेची हत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

दर्शन शाह अपहरण-हत्या प्रकरणी दोषीला जन्मठेप

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रच लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा याच्या खून खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. खंडणीसाठी दर्शनचं अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १ लाख ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि  सत्र न्यायाधीश एल. डी. बिले  यांनी हा निकाल मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी दिला.

कोल्हापूरच्या देवकर पाणंद इथे राहणारा अल्पवयीन शाळकरी मुलगा दर्शन शहाचं २५ डिसेंबर २०१२ रोजी योगेश उर्फ चारु चांदणेने अपहरण केलं होतं. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर २५ तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती.

पोलिसांनी घटनेचा तपास करुन चारु चांदणे या आरोपीला अटक केली होती. मार्च २०१३ मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जानेवारी २०१६ पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. या केसमध्ये न्यायालयात ३० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २२ पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. सोमवारी या खटल्यावर निकाल होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणेला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणेला या गुन्ह्यात दोषी ठरवलं.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे असून सुप्रीम कोर्टाचे दाखले देत दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावत आरोपी चारु चांदणेला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि १ लाख ५ हजारांचा दंड ठोठावला. या दंडातील एक लाखाची रक्कम ही दर्शनच्या आईला देण्याचंही न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे.

शिवसेनेच्या पेडणेकर-कुसळे समर्थकांमध्ये हाणामारी

मुंबईशिवसैनिकांमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थक एकमेकांशी भिडले.

या समर्थकांची प्रचंड हाणामारी झाली. यामध्ये दोन शिवसैनिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पक्षसंघटनेत झालेल्या बदलानंतर अनेक दिवसांपासून हा वाद सुरु होता. तो आज हातघाईवर आला. शिवसेनेत अनेकांना पदं डावल्यानं रविवारपासून वरळी, डीलाईलरोड, भायखळा, प्रभादेवी, लालबाग परळ भागात अनेक शिवसैनिक नाराज होते. त्या नाराजीतून हा वाद उफाळून आल्याचं सांगण्यात येत आहे.

अशोक चव्हाणांच्या मुलींच्या फ्लॅटची जप्ती झालीच नाही!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींचे शुभदा सोसायटीमधील फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली होती. मात्र, मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याला चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषद संपल्यानंतर पाटील यांनी एक कागद दाखवून ‘अशोक चव्हाण यांनी सुखदा सोसायटीत फ्लॅट घेताना कसा भ्रष्टाचार केला आहे’, याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. आदर्श गृहनिर्माण सोसायटीतील भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्रिपद गमावावे लागलेल्या चव्हाणांवरील या नव्या आरोपामुळे सनसनाटी निर्माण झाली.

बाबूराव माणिकराव पाटील व नारायण गिरामजी पाटील या माजी आमदारांनी सुजया अशोक चव्हाण व श्रीजया अशोक चव्हाण यांना आपले वारसदार नेमून सुखदा सोसायटीत फ्लॅट दिले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाला होता. मात्र, आता दोन्ही फ्लॅट महसूल विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगताच ही ब्रेकिंग न्यूज सर्वत्र प्रसारित झाली. या बातमीची खातरजमा करण्यासाठी पत्रकारांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांच्याशी संपर्क साधला. त्यावर ‘फ्लॅट ताब्यात घेण्याचे आदेश आमच्या कार्यालयातून निघालेले नाहीत. अशी कारवाई झाल्याची माहितीही माझ्याकडे आलेली नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

संभ्रम पसरवण्याचा भाजपचा डाव
अशोक चव्हाण यांच्यावर आधीच आदर्श प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ११ आॅक्टोबरला होणाऱ्या नांदेड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन आरोप करून चव्हाणांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

माझे फ्लॅट नियमानुसारच; अशोक चव्हाणांचा दावा
सुखदा सोसायटीमधील माझे फ्लॅट नियमानुसार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या फ्लॅटच्या संदर्भात मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा अन्य कोणीही कारवाई केली नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच मला फोनवरून दिली, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

आता..शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा पुतळा

उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना आखतंय. ‘नव्य अयोध्या’ या योजनेंतर्गत सरकार हा भव्य पुतळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करत आहे. शरयू नदीच्या काठावर रामाचा एक भव्य पुतळा उभारण्यासाठीचा प्रस्ताव योगी सरकारनं राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पाठवला आहे. पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या प्रस्तावाचं प्रेझेंटेशन दिलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रामाच्या या भव्य पुतळ्याची उंची १०० मीटरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परंतु राज्यपाल राम नाईक यांनी अद्याप या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेला नाही. उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये १८ ऑक्टोबरच्या दिवाळी सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दीपावलीच्या निमित्तानं १,७१,००० दीप प्रज्वलितही करण्यात येणार आहे.

या दीपावलीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अलफोन्स आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थिती दर्शविणार आहेत. मात्र हा भव्य पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या परवानगीचीही आवश्यकता आहे. अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा 195.89 कोटींचा आराखडा योगी सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. ज्यापैकी १३३.७० कोटींचा निधी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला सुपूर्दही केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळून आला होता. पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

उत्तर प्रदेश सरकारने नव्या पर्यटनस्थळांमध्ये गोरखधाम मंदिराचा समावेश केला आहे. त्यात मंदिराचे छायाचित्र, त्याचे महत्त्व, इतिहास ही माहिती आहे. या पुस्तिकेचे पहिले पान वाराणसी येथील गंगा आरतीला समर्पित करण्यात आले आहे. पुस्तिकेत पर्यटन विकास योजनाची माहिती आहे. पहिल्या पानाबरोबरच सहावे आणि सातवे पानही गंगा आरतीला समर्पित केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले नव्हते.

मंदीत नोकरी गमावणाऱ्या तरुणाचा वार्षिक उत्पन्न कोटीत

मुंबई: सुजय सोहानी नावाच्या तरूणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करत होता. नोकरी गेल्यामुळे त्याने नवीन नोकरी शोधण्यापेक्षा लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. वडापाव विकून लंडनमधले दोन भारतीय तरूण कोट्यधीश झाले आहेत.

मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड यादीत वडापावचं स्थान खूप वेगळं आहे. चविष्ट, पोट भरणारा आणि खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारा वडापाव मुंबईकरांच्या विशेष आवडीचा. हाच वडापाव विकून लंडनमधले दोन भारतीय तरूण कोट्यधीश झाले आहेत. सुजय सोहानी नावाच्या तरूणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करायचा. बेरोजगार झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यासमोर होता. लंडनसारख्या शहरात राहायचं म्हणजे हातात पैसा हवाच, त्यामुळे वेळीच हालचाल केली पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात आला. नवीन नोकरी शोधण्यापेक्षा त्याने लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. सुजयने या कामात त्याच्या मित्राची मदत घेतली. व्यवसायाचा विचार त्याने सुबोध जोशीला बोलून दाखवला आणि सुबोधनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. हे दोघंही मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे. खाद्यपदार्थाच्या व्यवसायात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र लंडनमध्ये नेमक्या कोणत्या खाद्यपदार्थाची विक्री करायची? असा प्रश्न दोघांसमोर होता. तेव्हा वडापाव विकण्याची कल्पना त्यांना सुचली. ‘हफिंग्टन पोस्ट’ च्या वृत्तानुसार एका आइस्क्रीम पार्लरमध्ये भाड्याने जागा घेऊन सुबोध आणि सुजयने वडापावचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मोफत वडापाव ग्राहकांना देऊन त्यांनी ग्राहकांची मनं जिंकली. हळूहळू उत्पन्न वाढू लागल्यानंतर या दोघांनीही पदार्थांची यादी वाढवत नेली. २०१० मध्ये त्यांनी ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावाचं भारतीय हॉटेल सुरु केलं.

वडापावसोबतच दाबेली, समोसा, भेळ, कचोरी, भजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस यांसारख्या पदार्थांची देखील विक्री करायला सुरूवात केली. सात वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना आता या व्यवसायातून वर्षाकाठी ४ कोटींहून अधिक रुपयांचा फायदा होतो.

फटाकेबंदीवरुन शिवसेनेतच जुंपली, संजय राऊतांचा फटाकेबंदीला विरोध

मुंबई : दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे. मात्र, या मुद्द्यावरुन शिवसेनेमध्येच दुफळी पडल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्री याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. ‘फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका.’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री असलेले रामदास कदम आणि संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील सर्व शाळेतील विद्यार्थी प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली.

गेल्या वर्षीची परिस्थिती टाळण्यासाठी फटाके बंदी

दिल्ली हे देशातलं सर्वात प्रदूषित शहर आहे. त्यातही दिवाळीवेळी इथल्या हवेत प्रदूषणाचा स्तर अधिक वाढतो. पंजाबी संस्कृतीत खरंतर प्रत्येक गोष्ट दणक्यात साजरी करायची पद्धत आहे. त्यामुळे दिल्लीतल्या फटाक्यांचं प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कैक पटीने अधिक असतं.  मागच्या वर्षी तर हे प्रमाण इतकं वाढलं, की शाळांना आठवड्याची सुट्टी जाहीर करावी लागली होती.

सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच दिल्लीत फटाक्यांची विक्री थांबवली होती. पण मागच्या महिन्यात फटाके विक्रेत्यांनी याचिका दाखल केल्यावर ती काहीशी सैल करण्यात आली. काल शाळकरी मुलांनी कोर्टात धाव घेतल्यावर ही बंदी पुन्हा 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. या काळात दिल्लीतल्या हवेची चाचणी करुन फटाकेबंदीचा कितपत फायदा होतो, हे कोर्टाला तपासायचं आहे. त्यानंतर राजधानीत कायमस्वरुपी फटाक्यांवर बंदी येऊ शकते.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं पर्यावरणप्रेमी स्वागत करत आहेत. पण काहींना मात्र हे हिंदू सणांवरचं अतिक्रमण वाटत आहे. अगदी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि लेखक चेतन भगत यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील पळवाटा

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयात अनेक पळवाटाही आहेत. हा निर्णय केवळ नॅशनल कॅपिटल रिजन अर्थात राजधानी क्षेत्रापुरताच आहे. दिल्लीच्या शेजारी वसलेल्या नोएडा, फरिदाबाद, गुडगावमध्ये हा निर्णय लागू नाही. शिवाय सध्या केवळ विक्रीवरच बंदी आहे. फटाके आधीच खरेदी करुन ठेवले असतील तर तुम्ही ते वाजवू शकता. त्यामुळे या निर्णयाचा कितपत प्रभाव दिसणार याबद्दल शंका आहे.

फटाक्यांशिवाय सण साजराच होऊ शकत नाही, अशी स्थिती बिलकूल नाही. आनंद लुटण्याऐवजी त्याचा अतिरेक केल्यानंतर कोर्टावर अशा निर्णयांची वेळ येते. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे पडसाद इतर हायकोर्टातही दिसून मुंबई-पुण्यासारखी आपली शहरं फटाकेमुक्त होणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

दिवाळीत कांदा रडवणार!

लासलगाव़: ऐन सणासुदीच्या दिवसात जनता महागाईने त्रस्त असतांना त्यामध्ये दिवाळीच्या तोंडावरच कांदा रडवण्याची चिन्हे आहेत. दिवाळीतच कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. दिवाळीपर्यंत हे दर आणखी वाढतील, असा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढत असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. लासलगाव एपीएमसीमध्ये गेल्या १० दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये सरासरी ८० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारी लासलगाव कांदा बाजारपेठेतील व्यवहार सुरु होताच कांद्याचे दर २१.३३ टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी कांद्याचे दर प्रति क्विंटल २,०२० रुपये इतके होते. सोमवारी कांद्याच्या दरांनी उसळी घेतली आणि ते २,४५३ रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहोचले. घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढल्याचा परिणाम काही दिवसांमध्ये किरकोळ बाजारातील विक्रीवरही पाहायला मिळेल. नाशिकमधील किरकोळ बाजारात सध्या कांद्याचा दर ३० रुपये प्रति किलो आहे. थोड्याच दिवसांमध्ये हा दर ३५ रुपये प्रति किलोवर जाऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या इतर भागांसह देशभरात कांद्याचा दर ५० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

‘दक्षिण भारतातून कांद्याला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत,’ अशी माहिती लासलगाव एपीएमसीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली. दिवाळीच्या कालावधीत लासलगावसहित कांद्याचे व्यवहार करणाऱ्या इतर बाजारपेठा आठवडाभर बंद राहणार आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर वाढवले आहेत.

अमिताब बच्चन वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाहीत!

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मंगळवारी ११ ऑक्टोबरला ७५ वा वाढदिवस आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी त्यांचे चाहते काही ना काही वेगळं करण्याचा नक्कीच विचार करत असतील. मात्र, यंदा त्यांच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण, बिग बी त्यांचा ७५ वा वाढदिवस आणि दिवाळी यावेळी साजरी करणार नाहीत.

अमिताभ यांनी स्वतः ते वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले. पण यामागे नेमके काय कारण आहे, याचा उलगडा त्यांनी केलेला नाही.

त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे मार्च महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कदाचित यामुळेच बिग बींनी कोणताही आनंद साजरा न करण्याचे ठरवल्याचे दिसते. अमिताभ बच्चन यांनी नुकेतच ट्विट करत त्यांनी ७५ वा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले. ‘होय, यंदा माझा ७५ वा वाढदिवस आहे. पण वाढदिवस आणि दिवाळीचे कोणत्याही प्रकारे सेलिब्रेशन करणार नाही’, असे म्हणत त्यांनी पुढे ‘अरे छोड़ दो यार ! बस सांस लेने दो !’ असेही लिहिलंय.