अडीच लोकांच सरकार?

‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. कारण आता विषय निघाला आहे अडीच लोक सरकार चालवत असल्याचा! हा विषय कुणी काढला असेल तर ते दस्तुरखुद्द भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी! यशवंत सिन्हानंतर आता अरुण शौरींनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. नोटबंदी हा आत्मघाती निर्णय होता. नोटबंदी हा साहसी निर्णय नसून हा निर्णय आत्महत्या करण्यासारखा आहे. सध्याचे सरकार हे फक्त अडीच लोक चालवत असल्याचे सांगत, केंद्र सरकार टीका केली. काही दिवसांपूर्वीच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेत नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले होते. हा केंद्र सरकारसाठी खूप चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारच्या कामकाजावरच भाजपाचेच नेते जर टीका करत असतील तर भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शौरी यांनी जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित केले आहेत. आज प्रत्येकजण विचार आहेत मोदींनी नोटा बंदी करतांना जे कारण दिले होते त्यात कितपत सत्यता आहे. किती काळे धन पूर्णपणे आता व्हाइट झाले का? दशहतवादी आजही हल्ला करत आहेत.

सरकारकडे सांगण्यासारखे आज काहीच नाही. अमित शहांनी तांत्रिक कारणांमुळे मंदीचे वातावरण असल्याचे विधान केले होते. हे कुणालाही न पटणार वक्तव्य होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना शौरी यांनी घेतलं, ‘शहा काय प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत का? तुम्ही सरकारी आकडे फार दिवस लपवून ठेवू शकत नाही.’ जर एका मागून एक भाजपाचीही मंडळी सरकारच्या कामाचे वाभाडे काढत असेल तर त्यामध्ये सत्यता आहे. विरोधकांकडून आधी आरोप होत होता की सरकार आमचे ऐकत नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी मोदी यांनी ‘आपको समझता नही’ असे बोलून त्यांना गप्प बसवले होते, तेव्हा पासून पटोले यांनीही सरकारच्या कामकाजावर टीका करायला सुरुवात केली होती. आता शौरी म्हणाले की, केंद्र सरकार कोणाचेही ऐकून घेत नाही. त्यांना सत्य जाणून घेण्याची आणि कोणाची सूचना ऐकण्याची इच्छा नाही. जर अशा प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या पक्षातील मंडळीकडून येत असेल तर त्यामध्ये सत्यता आहे. आरबीआयने लघु आणि मध्यम उद्योजकांना संकटात टाकले आहे. असे शौरी म्हणाले, ‘यशवंत सिन्हा, पी. चिदंबरम आणि इतरही अर्थतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. इकॉनॉमिक सर्व्हे, आरबीआय सर्व्हेमधूनही सत्य समोर येत आहे. जीडीपी घसरुन ३.७ वर गेला. २०१५-१६  मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन ९५%  होते, या वर्षी एप्रिल-जुलै दरम्यान त्यात घसरण होऊन थेट १.७% वर पोहोचले आहे. ही चिंतेची बाब आहे. ‘नोटाबंदी ही मनी लाँड्रिंग स्किम होती. हा मूर्खपणाचा झटका होता.

नोटबंदी करून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. तब्बल ९९ टक्के जुन्या नोटा बँकेत परत आल्याचं सांगून भारतीय रिझर्व्हे बँकेने त्याचा पुरावाच दिल्याचा आरोप शौरी यांनी केला. देशाच्या अर्थव्यवस्थेत काहीच सुधारणा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे निव्वळ इव्हेन्ट मॅनेजमेंट सरकार आहे. त्यांचा फोकस केवळ इव्हेन्ट मॅनेजमेंटवर आहे. केवळ मोठमोठ्या गोष्टी सांगण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत काहीच सुधारणा होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हि चिंतेची बाब आहे. जर अशीच परिस्थिती असेल तर सरकारने विरोधकांचे सोडा त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे ऐकावे अन्यथा सरकारला अच्छे दिन सोडा,बुरे दिन बघावे लागतील.

अभद्र युतीपेक्षा जनतेचा हित जपा!

राजकारणी,अधिकारी,बिल्डर यांची अभद्र युती असल्याची नेहमीच टीका होते. व त्यामध्ये बऱ्याप्रमाणात सत्यताही आहे. विकासकांनी (बिल्डर) घेतलेला निर्णय निर्णय सरकार दरबारी होत असतात. स्थावर मालमत्ता क्षेत्रात भरमसाठ फायदा असल्याने कायदे व नियम मोडण्याची प्रवृत्ती वाढत गेली. सरकारी यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विकासकांचे फावलेच. राजकारणी, अधिकारी आणि विकासकांच्या अभद्र युतीने सामान्य नागरिकांची मात्र  फसवणूकच झाली.

ग्राहकांकडून पैसे घेऊन सदनिकांचा ताबा न देणे, अनधिकृत बांधकाम करणे, अर्धवट कामे करणे यांसारखे विविध प्रकार विकासकांनी केले वा अजूनही सुरू आहेत. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी राजकारणी पुढे असतात, कारवाई झाली असे क्वचितच आढळते. राजकारण्यांचे खिसे ओले झालेले असतात किंवा त्या प्रकल्पात बेनामी सदनिका मिळालेली असते. !ठाण्यात परमार विकासकाने ‘राजकारण्यांच्या जाचाला कंटाळून’ केलेली आत्महत्या हे एक उदाहरण आहे.

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना सरळ करण्याची भाषा अनेकदा राज्यकर्त्यांकडून केली जाते, पण आपल्याकडील व्यवस्था एवढी प्रभावी नसल्यानेच विकासकांचे कोणी वाकडे करू शकत नाही. आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा विकासकांना झटका देण्याचा प्रयत्न केला होता. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामान्य ग्राहकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. विकासकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्राधिकरणाची कल्पना सुमारे १० वर्षे चर्चेत होती. विकासकांची लॉबी प्रभावी असल्यानेच या प्राधिकरणाच्या स्थापनेला मुहूर्तच मिळत नव्हता. प्राधिकरण स्थापण्याबाबतचे विधेयक राज्य विधिमंडळात मंजूर होऊ नये म्हणून विकासकांच्या लॉबीने आकाशपाताळ एक केले होते. अशा प्राधिकरणाच्या- ‘महारेरा’च्या- स्थापनेनंतर सरकारने भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींचेही मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मानीव अभिहस्तांतरण म्हणजे इमारत उभी असलेली जागा संबंधित इमारतीच्या मालकीची होणे. मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास इमारत उभी असलेल्या जागेची मालकी विकासक किंवा मूळ मालकाच्या नावावरच राहते.

इमारतीचा पुनर्विकास करताना अडचण येते.  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये ही समस्या मोठी आहे. भोगवटा प्रमाणपत्र असल्याशिवाय अभिहस्तांतरणाची प्रक्रिया करता येत नाही. विकासक इमारत किंवा प्रकल्प उभारताना बहुतांशी काम पूर्ण झाल्यावर अंशत: भोगवटा प्रमाणपत्र घेतात. हे प्रमाणपत्र दाखवून खरेदीदारांना सदनिकांचा ताबा दिला जातो. पण पुढेच नेमकी गोम असते. विकासक मग मूळ आराखडय़ात त्याच्या फायद्याचे बदल करतो. अनधिकृत किंवा वाढीव बांधकाम केले जाते. मूळ आराखडय़ात बदल किंवा त्याचे उल्लंघन झाले असल्यास इमारतीला अंतिम भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही. तोपर्यंत विकासक सदनिकांचा ताबा देऊन निघून गेलेला असतो. मुंबई, ठाणे, पुण्यात अशा अनेक इमारती आहेत. भोगवटा प्रमाणपत्र असल्याशिवाय मानीव अभिहस्तांतरण होत नाही. त्यामुळेच भोगवटा प्रमाणपत्राची अट रद्द करावी, अशी अनेक वर्षे मागणी होती. सरकारने ही अट काढून हजारो सदनिकाधारकांना दिलासा दिला आहे. निर्णय चांगला असला तरी एक मोठा धोका आहे व त्याबाबत सरकारला स्पष्टता आणावी लागेल. कारण भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींचे मानीव अभिहस्तांतरण करताना दंड किंवा काही रक्कम वसूल केली जाईल. ही रक्कम विकासकांकडून वसूल केली जाणे आवश्यक आहे. अन्यथा सदनिकाधारकांवर नाहक हा बिल्डरने लादलेला बोजा पडायचा. विकासकांपेक्षा खरेदी दारांसाठी घेतलेले निर्णय हिताचे राहतील. परंतु राजकीय मंडळींचे आर्थिक हितसंबंध आड येऊन विकासकांना झुकते माप दिले जातात. या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

खटारा एस.टी ला अच्छे दिन कधी येणार!

प्रवाशांच्या सेवेसाठी हे बीद्र घेऊन एस.टी महामंडळाची सेवा सध्या सुरु आहे. एस.टी महामंडळाकडून परिवहन खात्याचे  एस.टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु असलेली सर्वसामान्यांच्या ‘खटारा एस.टी ला अच्छे दिन’ तर आलेच नाही, उलट परिवहन खात्यातील मंडळींनाच अच्छे दिन आले आहेत. खटारा एस.टी महामंडळ खटारा बनत चालले आहे. दररोज राज्यात ६५ ते ७० लाख प्रवासी एस.टीने प्रवास करतात तरीही एस.टी तोट्यात असल्याची ओरड होतांना दिसत आहेत. जानेवारी २०१६ मध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात शिवशाही बसची घोषणा केली होती. त्यावेळी ५०० बसेस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले.

एसटी महामंडळांने लाखो प्रवाशांना दाखवलेल्या वातानुकूलित संपूर्ण  ‘शिवशाही’ बसचे स्वप्न या वर्षांतही पूर्ण होणार नाही. शिवशाही बस दाखल करण्याची जानेवारी २०१६ मध्ये घोषणा होऊनही आतापर्यंत २००० पैकी १३ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत आणि चार मार्गावर त्यांची सेवा सुरु आहे. स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्वावरील अशा ५७ बस पुढील महिन्यात दाखल होतील. वायफाय, सीसीटीव्ही व स्लीपर कोचच्या सुविधा असलेल्या शिवशाही बसचे पहिले दर्शन जानेवारी २०१६ मध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घडवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात शिवशाही बसची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ५०० बसेस लवकरच ताफ्यात सामील होतील, असे जाहीर करण्यात आले होत. भाडेतत्वावर या बसेस महामंडळांला पुरवण्यात येणार होत्या. त्यात चालक कंपनीचा तर कंडक्टर हा महामंडळांचा असणार होता. मात्र, वर्षभरात शिवशाही बसेस प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्याची तारीख कधीच जुळून आली. थेट जून २०१७ रोजी पुन्हा शिवशाही बसला परिवहन मंत्र्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि शिवशाही बस दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. भाडेतत्वावरील ५०० बसची संख्याही वाढवण्यात आली. ५०० वरून थेट ही संख्या १५०० पर्यंत नेण्यात आली. तर ५०० वातानुकूलित शिवशाही बस या स्वत:च्या मालकीच्या घेण्यात येणार होत्या. अशा तऱ्हेने दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. भाडेतत्वावरील १,५०० पैकी ५०० बस तर १५ ऑगस्टपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. परंतु ही मुदतही उलटून गेली. आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात १३ शिवशाही बसच दाखल असून यामध्ये एक बस  एसटीच्या मालकीची आहे. तर ऊर्वरीत बस या भाडेतत्त्वावरील आहेत. १३ बस या पुणे-लातूर, पुणे-सोलापूर, पुणे-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी मार्गावर धावतात. मंत्री मोठ मोठ्या घोषणा देऊन मोकळे होतात. परंतु अंमलबजावणीच्या नावाने भट्याभोळ आहे. एस.टीच्या ज्या बसेस आहेत त्या खटारा बनल्या आहेत. खाजगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत एस.टी मुकाबला करु शकत नाही. एस.टीकडे लक्ष दिले तरच प्रवाशांच्या सेवेसाठीचे ते खरे उतरतील.

दाऊद, भाजपा आणि सेटलमेंट!

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळून आणू असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. तीच रिघ ओढत नरेंद्र मोदी यांनीही निवडणूकीच्या काळात दाऊद ला आणण्याची भाषा केली होती. त्यावेळी भाजपाची सत्ता आली होती परंतु दाऊदला ते पकडून आणू शकले नाही. त्यानंतर भाजपावर बरीच टीका झाली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाऊद आणि भाजपाचा सेटलमेंटचा गंभीर आरोप केला होता. ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ जरी उडाली. एका राजकीय पक्षाचा एवढा गंभीर आरोप भाजपावर करत असेल तर त्यांच्याकडे नक्कीच काही तरी पुरावे असतीलच. भाजपा जर खरच सेटलमेंट करत नसेल तर त्यांनी याचा जाब विचारणेही गरजेचे आहे. मात्र भाजपाचे प्रवक्ते या आरोपांना गांभीर्याने न घेता सहज आरोपाचे खंडन करुन मोकळे होत आहे. यामुळे लोकांच्या मनात शंकेला वाव आहे असेच म्हणावे लागेल. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे, मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचं सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप मनसे  राज ठाकरे यांनी एफबी पेजच्या लाँचिंगवेळी मोदी सरकारवर  केला. दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. हा विनोद नाही.

दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘भारतात येण्याची त्याची इच्छा आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण दाऊदला पकडून भारतात आणल्याचा डंका पिटणार’ असं राज म्हणाले. बॉम्बस्फोटाला इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते आम्ही केलं, दाऊदला आमच्या पंतप्रधानांनी पकडून आणलं, असा दावा भाजप करणार आणि श्रेय लाटून आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी त्याचा फायदा करुन घेणार, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला. जर ठाकरे इतका मोठा आणि सरकारवरच गंभीर आरोप लावत असतील तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. सत्ताधारी पक्षावर कुख्यात गुंड दाऊद च्या सेटलमेंटचा आरोप होत असेल तर तो गंभीर आहे. या बाबत विरोधकांकडून प्रश्न विचारले जातील. सरकारच्या अर्थातच भाजपा बद्दल लोकांमध्ये संशय उपस्थित केले जाईल. यामुळे भाजपाने वेळेवरच सावध होण्याची गरज आहे.

नानांचे स्वयकियांविरोधात ना..ना…!

नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकारच्या विरोधात रोष व्यक्त सुरु असतांना भाजपाचेच खासदार गोंदिया-भंडाराचे  नाना पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे सरकारची प्रतिमा डागळली आहे. हे होत असतांना त्यांच्याच पक्षाचे माजी वित्तमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनीही नोटबंदीवरुन सरकारला लक्ष्य केले. यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. काही दिवसांपासून नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार पटोले यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे.

यापूर्वीही नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारनं सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. कुणाच्या खुर्चीवर असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडता येत नसतील, तर ती खुर्चीच परत देऊ असं म्हणत पटोले यांनी पुढचे संकेत दिले.

मोदी सरकार हे अंबानी आणि अदानी यांची घरं भरण्याचं काम करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. एनडीएमध्ये सत्ताधारी पक्षातूनच विरोध वाढत चालला आहे. पटोले हे शेतकरी कुटंबातील नेते असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. त्यांनी बोलण्याची हिंमत केली हेच त्यांची खरी ताकद. सत्तेत राहून जर चुकीचे काही घडत असेल तर त्याच्याविरोधात बोलण्याची हिंम्मत खूप कमी नेते करतात. सत्ताधारी नेते जर चुकीच्या घटनांवर बोलत असतील ते स्वागतहार्य आहे. माजी वितमंत्री यशवंत सिन्हा यांनी नोटबंदीवरुन सरकारचे वाभाडे काढल्यामुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली. विरोधकांनीही यशवंत सिन्हांच्या मताचे समर्थन केले.आम्ही आतापर्यंत हेच बोलत होतो. आता त्यांच्याच पक्षातील नेत्यानींही तेच सांगितले यामुळे विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले होते. खासदार पटोलोही आता सरकारच्या कामकाजावर आक्रमक होत चालले असल्यामुळे ते कोणत्याही क्षणी खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडू शकतात. याचाच अर्थ पक्षाची,सरकारची प्रतिमा त्यांच्याच खासदाराला आवडत नसल्यामुळे सरकार विरोधात आक्रोश वाढत असल्याचे दिसून येत आहे.

रोहिंग्या हिंदूंवरही हल्ले का?

रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंना सुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. ही चिंतेची बाब आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत आहे. बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोक जेवणाची व्यवस्था करण्यात आली. हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. पण, यामध्ये गरोदर महिलांचाही सहभाग आहे. पंधरा वर्षीय अनीता धरच्या घरात, ”काही लोकं चेहऱ्याला काळे रूमाल बांधून घुसले होते.

त्यांनी घराची नासधूस केली आणि तिच्या पतीला उचलून नेले. “दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. शिर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता अनीता तिथून पळाली. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.”बांगलादेश म्यानमारच्या सीमेवरच्या गावात पोहोचली. अनीता प्रमाणे इतर १६० रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत. मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचेही हाल होत आहेत. म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही. ५५० हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलंय. शोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे.

शोभा रुद्र नावाच्या महिलेच्या काकांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं. त्यांनतर त्यांना पळून जाव लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. अशा प्रतिक्रिया महिलेकडून व्यक्त करण्यात आल्या. विदारक आणि संताप आणणाऱ्या घटना घडत आहेत. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही.” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत २५ हिंदू कुटुंब राहतात.
त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे. पण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही.

काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या ‘मुर्गी फार्म’वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे. सकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लोकांनी स्वत:च्या घरात व जागांमध्ये आश्रय दिला आहे. शरणार्थींना आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत. पण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे. फक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावर सुद्धा अत्याचार होत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

लाठीहल्ला संतापजनक!

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर २१ सप्टेंबर रोजी लाठीमार करण्याचा प्रकार संतापजनक, आणि चिड निर्माण करणारा आहे. विद्यापीठात विदयार्थीनीची छेड काढल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते आणि त्यांच्यावरच लाठी हल्ला होतो. हा सर्व प्रकार संतापजनक आणि चिड निर्माण करणारा आहे. लाठी हल्याच्या निषेधार्थ सर्वत्र विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करत आहेत. विद्यापीठातील सर्व प्रकारणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. कधी जेएनयु तर कधी बीएचयू मध्ये वाद होतांना दिसत आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि गेल्या चार दिवसांत कॅम्प्समधील घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश वाराणसी जिल्हा प्रशासनाने दिले. विदयार्थ्यांवर लाठीहल्ला होतो तो कुणाच्या इशाऱ्यांवर होतो हेही तपासणे तितकेच महत्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांवर लाठीमार, कारवाई करणाऱ्या पोलिसांनी प्रकरणाचा अहवाल वाराणसीचे विभागीय पोलीस आयुक्त नितीन गोकर्ण यांनी मुख्य सचिव राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे संवेदनशील प्रकरण योग्यरितीने हाताळले नाही, असा ठपका त्यात ठेवला आहे. पोलीस पथकावर हल्ला आणि हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील १००० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोकर्ण यांनी हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कुलगुरू आणि पीडित मुलीसह १२ जणांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही.

योग्य वेळेत या प्रकरणी तोडगा काढला असता तर हा वाद निर्माण झाला नसता, असे या अहवालात म्हटले आहे. ‘बीएचयू’मध्ये विद्यार्थिनींना मुलांकडून छेडछाडीला सामोरे जावे लागत होते. या विरोधात या विद्यार्थिनींनी आंदोलन पुकारले होते. मात्र, त्याकडे विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही. उलट आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यासंबंधी कुलगुरुंनी बेजबाबदारपणे उत्तरे देऊन मोकळे झाले आहेत. आंदोलनामागे ‘बाहेरच्या व्यक्ती’ असल्याचा दावा कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांनी केला आहे. विद्यापीठाचा परिसर विद्यार्थिनींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

बाहेरील काही व्यक्तींनी स्वार्थासाठी उकरून काढला, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच प्रत्येक मुलीचे ऐकले तर विद्यापीठाचा कारभार हाकणे कठिण होऊन बसेल, असे वक्तव्यही त्यांनी केले. असे विधान करणे चुकीचे आणि संतापजनक आहे.  तरुण कायम सत्य आणि न्यायासाठी लढतात. पण येथील विद्यार्थ्यांना जे सत्य वाटते त्यासाठी ते लढत आहेत. काही लोकांचा  स्वार्थ असेलही परंतु आंदोलन कर्तै आपल्या न्यासाठी आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर लाठीहल्ला करणे कितपत योग्य आहे. पोलिस बळाचा वापर करुन लाठ्या चालवणे हा अतिरेकपणा कसा काय चालतो याचेही उत्तरे पोलिस आणि विद्यापीठ प्रशासनाला द्यावे लागतील. बनारस हिंदू विद्यापीठच नाही तर देशातील अनेक विद्यापीठे अशा मानसिकतेचे बळी पडले आहेत. परंतु ज्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सरकार गडगडणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. याचाच अर्थ शिवसेना कोणत्याही क्षणी सरकारचा पाठिंबा काढू शकते व सरकार गडगडू शकते. गेल्या तीन वर्षापासून शिवसेना,भाजपाची नुराकुस्ती सुरु आहे.दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप,प्रत्यारोप करत आहेत.यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही क्षणी घटस्फोट होऊ शकते अशी सध्याची चिन्हे आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर केंद्र सरकारचा कल आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्यामुळे सरकार कोसळू शकते अशीच चिन्हे आहेत. सरकारच्या कामकाजावर सर्व बाजूने टीका होत आहेत. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरुन निकषाची भानगड सध्या सुरुच आहे.

सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे त्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. जनमत पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले आहे, देशातले उद्योग आज बंद पडायला लागले आहेत. गरीब वर्ग नाराज आहे. शेतकरी आत्महत्या करतोय. तर आता तळागाळातला गरीब वर्गही त्याच मार्गाने जातो की काय याची भीती वाटतेय, जापानमध्ये प्रचंड आर्थिक मंदी सुरू आहे. जापानची आर्थिक मंदी घालविण्यासाठीच बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबविण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यातील कारभार सगळा काही आलबेल आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचे काम सुरुच आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावरुन सडकून टीका केली. तसेच नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना भाजपाने त्यांच्या कोट्यातून मंत्रीपद दिले तर तेही शिवसेनेला सहन होणार नाही अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यामुळे राज्य सरकारला कधीही बुरे दिन येऊ शकतात.

सिन्हांचा ‘घरचा आहेर’ विचारमंथन करणारा!

महागाई, नोटबंदीवरुन भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी आक्षेप घेत सरकारला घरचा आहेर दिला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीच्या घसरणीत नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असा हल्लाबोल भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे. बऱ्याच अर्थतज्ञांनीही सरकारच्या नोटबंदीवर आक्षेप घेत चिंता व्यक्त केलेली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला ‘चौपट’ करण्याचे काम केले आहे. यावर मी गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असे म्हणत त्यांनी जेटलींवरच थेट तोफ डागली.

पक्षाविरोधात बोलण्याचे धाडस करत नाहीत, असे लोक माझ्या बोलण्याने दुखावले जातील, हे मला ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. जे काही वातावरण आहे त्याच्यावर बोलण्याचे धाडस सिन्हा यांनी केले. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचे मानले जाते. २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात होते. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असेही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आणि किचकट आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावे लागते. याचाच अर्थ ‘सुपरमॅन’ अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटले असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. खासगी गुंतवणुकीत घट आली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादन खूपच घसरले आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे. उत्पादन, रोजगार, सेवा आदी क्षेत्र संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, यावरही चिंता व्यक़्त केली.

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. नोटाबंदीचा निर्णय खूपच चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. लाखोंना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होत आहे. जीडीपी ५.७ टक्क्यांवर आला. गेल्या तीन वर्षांतील निचांकी नोंदवली. पण नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जाते. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सध्याच्या सरकारने २०१५ मध्ये जीडीपी मोजण्याच्या पद्धतीत बदल केले होते. आताच्या जीडीपीची जुन्या पद्धतीने गणना केली असती ५.७ टक्के असलेला आर्थिक विकास दर ३.७ टक्के किंवा त्याहून कमी असता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नोटबंदी नंतर देशातील परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. अशा वेळी बऱ्याच अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे. भाजपातील एक ज्येष्ठ माजी मंत्री जर भाजपाच्या मंत्र्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढत असेल तर ही भाजपासाठी चिंतेची आणि आत्मचिंतनाची गरज आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.

स्वाभिमान नव्हे लाचारी!

काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची’ स्थापना केल्याची घोषणा केली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम असल्याची खंत व्यक्त केली. राणे यांनी १२ वर्ष काँग्रेसमध्ये सत्तेतून राहून सत्तेची फळे चाखली. मुख्यमंत्रीपद दिले नाही. दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करुन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. राणे हे भाजपात प्रवेश करणार होते हे आधीपासूनच ठरल होत.

पक्षाचे अध्यक्ष अमित शहा,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिल्लीला बैठकही झाली होती. परंतु शिवसेनेमुळे भाजपाची गोची झाली आणि त्यांनी आपला डाव बदलला. राणे यांना भाजपात प्रवेश देऊ नये अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा नव्हती. तसेच भाजपात प्रवेश दिला असता तर शिवसेनेने कदाचीत भाजपाचा पाठिंबा काढून सरकार पाडले असते. यामुळे राणे यांना थेट भाजपामध्ये प्रवेश न देता त्यांना इतर पक्षाची स्थापना करायला लावून एनडीएमध्ये शामिल करण्याची व्यूहरचना भाजपाच्याच चतुर मंडळींनी आखून दिली. राणे यांनी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. खरतर राणे यांचा विधानसभेत दोनवेळा पराभव झाल्यामुळे त्यांचीही फारशी ताकद नाही. त्यांच्यासोबत त्यांचा पुत्र सोडून एकही आमदार नाही. अशा स्थितीत भाजपाने राणे यांना फारशी किंमत दिली. परंतु शिवसेनेला विरोध करणारा व त्यांच्या विरोधात बोलणारा व्यक्ती राणे यांच्या रुपात भाजपाला मिळाला आहे. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही.

पदासाठी मी तडजोड करणार नाही असे राणे यांनी पक्षस्थापना करतांना सांगितले परंतु मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा अजूनही आहे असे त्यांनी जरी सांगितले तरी ती त्यांची लाचारी आहे हेच यातून स्पष्ट होते. ‘देऊ शब्द तो पुरा करू’ असे आमच्या पक्षाचे ब्रिद वाक्य असेल असे नारायण राणेंनी जाहीर केले. परंतु राणे भविष्यात ज्यांच्या सोबत जातील त्यांनी राणेंना मागितलेले पद दिले नाही तर राणे यांच्या पक्षाचे जे ब्रीद आहे त्यांच्या विरुध्द म्हणजेच दिलेले शब्द पाळले नाही म्हणजेच विरोध करु असाच होईल. यामुळे राणे यांना राजकीय पक्ष चालवणे व अस्तिव दाखवणे तितके सोपे नाही. राणे पक्ष खाजगी लिमिटेड पार्टी म्हणून अस्तित्वात राहिल.