होम महाराष्ट्र उर्मिला मातोंडकर अखेर भाजपात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी

उर्मिला मातोंडकर अखेर भाजपात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी

उर्मिला मातोंडकर या आधीपासूनच भाजपात येण्यास उत्सुक होत्या. मात्र तीन दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करत गोपाळ शेट्टींविरोधात उमेदवारी मिळालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अखेर भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांच्या रूपाने काँग्रेसने भाजपाला दिलेले आव्हान अखेर संपुष्टात आले आहे. उर्मिला मातोंडकर या भाजपातच येण्यास उत्सुक होत्या. मात्र काँग्रेसवाल्यांनी त्यांना आपल्याकडे वळवले. आता त्या भाजपात आल्या आहेत आणि कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत मात्र आमच्या स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडेच जबाबदारी देण्यात आली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेक भाजपाच्या नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. शिवसेनेचे नेतेही हेच म्हणत होते की आता भाजपा ती जागा कशी जिंकणार? कारण राम नाईक विरूद्ध गोविंदा यांच्या लढतीत गोविंदा जिंकून आल्याचं भल्या भल्यांना ठाऊक आहे. गोविंदा हा नट खासदार झाला, त्याला संसदेतल्या दांड्या काही न केलेली कामं ही जरी चर्चेचा विषय ठरली असली तरीही त्याने राम नाईक यांचा पराभव सगळ्यांच्याच लक्षात आहे. मात्र आता उर्मिला मातोंडकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपातल्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

परवा अत्यंत त्वेषाने भाषण करून मी विकासाला महत्त्व देते, जात-पात मानत नाही असे म्हणणाऱ्या उर्मिला मातोंडकर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करताना दिसणार आहेत. मी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र जेव्हा मुख्यमंत्री स्वतः मला भेटले आणि मला त्यांनी सांगितले की सब का साथ सबका विकास हेच आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे. तुम्ही भाजपात या आणि मोदींचा प्रचार करा तेव्हा मी नाही म्हणू शकले नाही. त्याचमुळे मी आता भाजपात प्रवेश केला आहे. मी कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका काय येतात आणि जातात मात्र मला लोकांच्या विकासासाठी काम करायचं आहे त्यामुळे मी यापुढे मोदींचा प्रचार करणार आणि मोदींनाच मत द्या असे सांगणार आहे. देशात विकास घडवायचा असेल तर मोदींना पर्याय नाही असे माझे मत आहे असेही उर्मिला मातोंडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.