होम क्रीडा आणखी एका क्रिकेट स्टारची ‘विकेट’

आणखी एका क्रिकेट स्टारची ‘विकेट’

16
0
शेयर

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्नाचा बार उडवण्याची चर्चा सुरु असतांनाच पुन्हा एका तरुण क्रिकेटपटूची विकेटपडली आहे. हा तरुण वीर आहे, आयपीएल आणि रणजी स्पर्धेतील स्टार फलंदाज मयांक अग्रवाल.

मयांकनं आपली गर्लफ्रेंड आस्था सूद हिला लंडनमधील थेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या आकाशपाळण्यात – अर्थात ‘लंडन आय’मध्ये फिल्मी स्टाइलनं लग्नाची मागणी घातली. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आस्थानं मयांकला होकार दिला असून नववर्षात ही जोडी लगीनगाठ बांधणार आहे.
२६ वर्षीय मयांक हा कर्नाटक रणजी संघाचा सलामीवीर आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून तो आयपीएल खेळतो. २०१७ हे वर्षं त्याच्यासाठी भलतंच ‘हिट’ ठरलं. या मोसमात ११६० धावा करून त्यानं टीम इंडियाच्या निवड समितीचं लक्ष वेधून घेतलंय. या वर्षाचा शेवटही गोड करायचं त्यानं ठरवलं आणि दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं. हृदयात आधीपासूनच घर केलेल्या मयांकला आस्थाने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

‘… आणि ती मला ‘हो’ म्हणालीय. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. हा क्षण आमच्यासाठी संस्मरणीय आहे’, अशा भावना मयांकनं व्यक्त केल्यात. क्रिकेटसोबतच प्रेमाचं मैदानही मारल्यानं मयांकवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.