Friday, March 29, 2024
Homeक्रीडाभारत-श्रीलंका कसोटीत भारताचा दणदणीत विजय!

भारत-श्रीलंका कसोटीत भारताचा दणदणीत विजय!

नागपूर: भारताच्या चारही गोलंदाजांनी चौथ्या दिवशी प्रभावी मारा करुन, नागपूर कसोटीत टीम इंडियाला एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या कसोटीत भारतीय संघानं पहिल्या डावात 405 धावांची आघाडी घेतली होती. पण श्रीलंकेचा दुसरा डाव आदल्या दिवशीच्या एक बाद 21 धावांवरुन सर्व बाद 145 असा गडगडला.

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलनं 61 धावांची खेळी उभारून एक खिंड लढवली. त्यानं सुरंगा लकमलच्या साथीनं नवव्या विकेटसाठी 58 धावांची झुंजार भागीदारीही रचली. पण त्यांना श्रीलंकेचा डावाचा मारा चुकवता आला नाही.

भारताकडून रवीचंद्रन अश्विननं चार विकेट्स घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे विकेट्सचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद तीनशे विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर जमा झाला.

ईशांत शर्मा, उमेश यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन त्याला छान साथ दिली.

भारताकडे भक्कम आघाडी

कर्णधार विराट कोहलीच्या दमदार द्विशतकामुळे टीम इंडियाला नागपूर कसोटी जिंकण्याची नामी संधी मिळाली.  नागूपर कसोटीत भारतानं आपला पहिला डाव सहा बाद 610 धावांवर घोषित केला. त्यामुळं टीम इंडियाच्या हाताशी पहिल्या डावात 405 धावांची आघाडी होती.

मग टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मानं नागपूर कसोटीत दुसऱ्या डावात श्रीलंकेला खातं उघडण्याआधीच पहिला धक्का दिला.

ईशांतनं सदिरा समरविक्रमाचा शून्यावरच त्रिफळा उडवला. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरू थिरीमनेनं श्रीलंकेला तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 धावांची मजल मारुन दिली होती.

विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं पाचवं द्विशतक

विराट कोहलीने कारकीर्दीतलं पाचवं द्विशतक झळकावून, नागपूर कसोटीवर टीम इंडियाची पकड आणखी घट्ट केली. विराटचं हे यंदाच्या मोसमातलं दुसरं कसोटी द्विशतक ठरलं. त्याने 259 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह या द्विशतकाला गवसणी घातली. 213 धावांवर तो बाद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments