Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडारिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात!

रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात!

मुंबई : प्रतिभा असली तर गरिबी तुमच्या यशाच्या आड कधीच येत नाही, असं म्हटलं जातं. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी मोहम्मद सिराजची निवड होणं हे त्याचंच एक उदाहरण आहे. वडील रिक्षाचालक, गरिबी पाचवीला पुजलेली, परंतु सिराजच्या कामगिरीमध्ये गरिबी कधीच अडचण ठरली नाही, किंबहुना वडिलांनी ती येऊ दिली नाही.

रिक्षाचालकाचा हा मुलगा आता विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांसोबत टीम इंडियाची जर्सी परिधान करुन खेळताना दिसेल. बीसीसीआयने सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यात विराट कोहली, लोकेश राहुल, शिखर धवन, मनिष पांडे या खेळाडूंचा समावेश आहेच. पण या मालिकेसाठी संघात जलद गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज श्रेयस अय्यर या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कोण आहे मोहम्मद सिराज?
मूळचा हैदराबादचा असलेल्या मोहम्मद सिराजसाठी ही बाब अगदी स्वप्नवत आहे. सिराजच्या आयुष्याला पहिल्यांदा वळण मिळालं ते आयपीएलच्या लिलावादरम्यान. या स्पर्धेच्या दहाव्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला २.६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. २३ वर्षीय सिराजने हैदराबादसाठी शानदार कामगिरी केली होती. त्याने ६ सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या.

वडील रिक्षाचालक, मात्र गरिबी करिअरच्या आड नाही!
सिराजचे वडील मोहम्मद गौस रिक्षाचालक होते. परंतु आर्थिक परिस्थिती कधीही सिराजच्या क्रिकेट करिअरमध्ये अडथळा बनली नाही. वडिलांनी आर्थिक तंगी कधीही मुलाच्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नाच्या आड कधीही येऊ दिली नाही. अनेक अडणींचा सामना करत, रिक्षा चालवत ते मुलासाठी महागड्या किट आणून देत असत. सिराजने गरिबी अतिशय जवळून पाहिली आहे. त्यामुळे तो घराजवळच्या गरुजू मुलांना मोफत क्रिकेट कोचिंग देतो. मोहम्मद सिराज कधीच कोचिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलं नाही, हे विशेष.

क्रिकेटमधील पहिलं बक्षीस होतं ५००रुपये!
सिराजने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. क्रिकेट करिअरची पहिली कमाई ५०० रुपयांची होती, असं मोहम्मद सिराजने एका मुलाखतीत सांगितलं. क्लबचा सामना होता आणि माझे मामा संघाचे कर्णधार होते. मी या सामन्यात २५ षटकांमध्ये २० धावांच्या मोबदल्यात ९ विकेट्स घेतल्या. माझ्या कामगिरीवर मामा खूश झाले होते. आम्ही हा सामना जिंकल्याने मामांनी मला बक्षीस म्हणून ५०० रुपये दिले होते. सिराजने १४ प्रथम श्रेणी सामन्यात ५३ आणि १३ लिस्ट-ए क्रिकेट सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत.

वीसाव्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट बॉल हातात
वयाच्या वीसाव्या वर्षापर्यंत मोहम्मद सिराज क्रिकेट बॉलने (सीझन बॉल) खेळला नव्हता. चारमिनार क्रिकेट क्लबकडून तो पहिल्या क्रिकेट बॉलने खेळला. राज्यस्तरीय क्रिकेट निवडीसाठी त्याने पाच विकेट्स घेतल्या. मात्र रणजी पदार्पणात हैदराबाद संघाकडून खेळताना त्याला १०८ धावांच्या मोबदल्यात केवळ एकच विकेट घेतली.

परंतु २०१६-१७ च्या मोसमात त्याने उत्तम कामगिरी करत, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

जुलै २०१७ मध्ये भारत ‘अ’ संघासाठी त्याची निवड झाली. ऑगस्टमध्ये अफगाणिस्तान ‘अ’विरुद्धच्या सामन्यात त्याने ४९ धावात तीन विकेट्स घेतल्या. तर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाविरोधात त्याची कामगिरी होती  २/२७ धावा.

२०१५ मध्ये रणजीत पदार्पण
मोहम्मद सिराजने २०१५ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. ९ सामन्यात ४१ विकेट्स घेऊन तो चर्चेत आला होता. या कामगिरीमुळे मोहम्मद सिराज लोकांच्या नजरेत आला. त्यानंतर सिलेक्टर्सनीही त्याची इराणी कपसाठी निवड केली होती. आता मोहम्मद सिराजची टीम इंडियात निवड झाली आहे. टी-20 मालिकेतही तो उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष देण्याचा आईचा सल्ला
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला त्याची आई कायमच ओरडत असे. मोठ्या भावाप्रमाणे अभ्यासाकडे लक्ष द्यावं, असं तिचं म्हणणं असायचं. मोहम्मद सिराजचा मोठा भाऊ मोहम्मद इस्माईल सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.

आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय!
सिराजला आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. वडील मोहम्मद गौस आणि आई शबाना बेगम यांच्यासाठी हैदराबादच्या पॉश परिसरात घर घेण्याचं सिराजचं स्वप्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments