Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeलाईफस्टाइलवसईमधील नाताळाची आगळीवेगळी झलक

वसईमधील नाताळाची आगळीवेगळी झलक

Christmas celebration in vasai, christmas, vasaiदिप्ती जोशी-

नाताळ सणावर पाश्चात्त्य परंपरांचा कितीही प्रभाव असला तरी भारतात स्थानिक पद्धतीनेच सण साजरा केला जातो. वसईचा नाताळ हा संस्कृतीचा जागर असतो. मूळची परंपरा, संस्कृती अद्यापि तशीच जोपासली जाते. त्यामुळे नाताळच्या महोत्सवात संस्कृती आणि परंपरेचे अनोखे दर्शन होत असते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नाताळची चाहूल लागलेली असते.

येशूचा जन्म गोठय़ात झाला होता, तर जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात. परंपरागत बनवण्यात येणाऱ्या नाताळ गोठय़ांमध्ये, सर्वसाधारणपणे डोंगर, नद्या, गवताळ परिसर तसेच लाकडी गोठा, मध्यभागी बाळ म्हणजेच येशू आणि डोक्यावर रंगवण्यात आलेला तारा एका बाजूला मेरी तर दुसऱ्या बाजूला जोसेफ, कोपऱ्यात बसलेली गाय, आपल्या मेंढरांसोबत गोठय़ाजवळ उभे असलेले मेंढपाळ आणि भेटवस्तू घेऊन आलेले तीन राजे. इतर सजावट, रोषणाई, विविध पद्धतीने केली जात असली तरीदेखील मूळ रचनेत या गोष्टी सर्वत्र पाहायला मिळतात. प्रत्येक रविवारी चर्चमध्ये पानांची माळ बनवून ती गोलाकार ठेवून त्यात विविध प्रकारच्या मेणबत्या लावल्या जातात. प्रभू येथूचं आगमन होणार आहे, तयारीला लागा, असे गात गावागावात तरुणांचे पथक फिरून आनंदाची आणि ख्रिस्ताची गाणी म्हणत म्हणत जणू जुलूसच निघतो. ही गाणी येशूच्या जन्माची, गौरवगीते, आनंद व्यक्त करणारी गीते आणि स्तुती करणारी गीते असतात.

वसईत चर्चच्या आवारात, घरच्या नाताळ गोठय़ांची स्पर्धा त्याचबरोबर सार्वजनिक गोठय़ांची स्पर्धा भरवण्यात येते.  त्यामुळे प्रत्येक जण उत्साहाने प्रदर्शनासाठी सहभागी असतात.  मग स्पर्धा ही चुरशीची होते. सर्वसाधारणपणे घरच्या सजावटींसाठी, देवतांच्या मूर्त्यां, ख्रिसमस ट्री, दिव्यांची रोषणाई आणि सांता बाबाचे मुखवटे इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. यामुळे एक उत्साहाच वातावरण निर्माण होत.

वसईत विविध पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाचा समावेश असतो. वसईत नाताळसाठी विशेष फराळ आणि जेवण बनवले जाते. आगरी, कुणबी आणि भंडारी या समाजातून जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांना ईस्ट इंडियन म्हटले जाते. तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून ‘फुगे’ हा पारंपरिक पदार्थ बनवण्यात येतो. ‘इंदेलो’ हा वसईतील प्रसिद्ध पदार्थ आहे. कोंबडीचे मांस आणि डुकराच्या वजरी, काळीज यापासून बनवला जातो. तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, लवंग, वेलची एकत्र करून केळीच्या पानावर थापून शिजवून पुन्हा निखाऱ्यावर केळीच्या पानासहित भाजून त्या पानाला काटी लावून मग खात यास पानकाडय़ा असे म्हणतात. मुळात सर्व पदार्थ मराठी माणसांच्या खाद्यसंस्कृतीशी मिळतेजुळतेच असते.

तरुण मुले-मुली गावांत, शहरांत, सार्वजनिक ठिकाणी नाताळ वादकांसह गीते गातात. सध्या तर असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ही गाणी येशूच्या जन्माची, गौरवगीते, आनंद व्यक्त करणारी गीते आणि स्तुती करणारी गीते असतात. जन्मोत्सवाचा दिवस जवळ येत आहे, आगमन काळ सुरू झालेला आहे तर तयारीला सुरुवात करा, असेही यातून सांगण्यात येते. सणाची वातावरणनिर्मिती तयार केली जाते.

वसईचे वैशिष्टय़ असे की सर्व प्रार्थना, गीते मराठीत होतात. तसेच पूर्वी भजन, कीर्तन, आरत्याही म्हटल्या जात होत्या. चाल, पद्धत तीच ठेवून शब्द बदलण्यात आले होते. ‘शांतीची ही रजनी, सुखाची ही कहाणी’  हे गीत अतिशय लोकप्रिय आहे. ‘बाळ जन्मले, विश्व आनंदले, विश्व अवतीभोवती झंकारलेअशा प्रकारची बाळ जन्माची गाणी तरुण मंडळी गाताना दिसतात. वसईतील नाताळ सोहळा हा सर्वाधिक पौराणिक तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा करताना दिसतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments