अखेर बारा दिवसानंतर व्हिडिओकॉनच्या कामकाजाला सुरुवात!

- Advertisement -

महत्वाचे…
१) ४५ हजार कोटींचे कंपनीवर कर्ज
) कंपनीत साडेसहा हजार कर्मचारी कार्यरत
3) कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते


औरंगाबाद – गेल्या बारा दिवसांपासून कामगारांना सक्तीच्या रजा देऊन बंद ठेवण्यात आलेली व्हिडिओकॉन कंपनी आज अखेर सुरू झाली आहे. डोक्यावर ४५ हजार कोटींचे कर्ज असलेली व्हिडिओकॉन कंपनी बंद झाल्यामुळे उद्योगनगरीवर अवकळा पसरली होती. पण आज अखेर ही कंपनी सुरू झाल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.मात्र कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक कायम आहे.

व्हिडिओकोन कंपनीने ८ जानेवारी रोजी अंतर्गत मेंटनन्सचे कारण देत जवळपास साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना १२ दिवसांची सक्तीची रजा दिली होती. कंपनीवर असलेले ४५ हजार कोटींचे कर्ज पाहता कंपनी आर्थिक डबघाईला आल्याची चर्चा जोरात सुरू होती. त्यातच २७ डिसेंबर ते पाच जानेवारी अशा आठ दिवस सुट्ट्या दिल्यानंतर पुन्हा १२ दिवसांची सक्तीची रजा दिली गेल्यामुळे अनेकांना कंपनीच्या भवितव्याबाबत शंका निर्माण झाली होती.
कंपनी बंद झाल्यामुळे कंपनीच्या सहा हजार कामागरांसह उद्योगनगरीतल्या तब्बल २० हजार कामगारांवर याचा थेट परिणाम झाला होता. तर तब्बल २०० लघुउद्योग बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे औरंगाबाद उद्योगनगरीवर अवकाळा पसरली होती. पण आज अखेर कंपनीने आपल्या कामगारांना कामावर बोलवत पुन्हा एकदा प्रोडक्शन सुरू केल्यामुळे उद्योग नगरीत पुन्हा एकदा चैतन्य पसरले आहे.

- Advertisement -
- Advertisement -