‘आप’चे निलंबित आमदार पुन्हा निवडून येतील कुमारांचा, ‘विश्वास’!

- Advertisement -

राहाता |  आप पक्षाच्या दिल्ली विधानसभेतील २० सदस्यांना दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली असल्याने पुन्हा आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जावे लागले तरी आम आदमी पार्टीचे निलंबित होणारे २० ही सदस्य पुन्हा त्याच जागेवर निवडून येतील, असे आपचे संस्थापक कार्यकत्रे कुमार विश्वास यांनी शिर्डीत सांगितले.

विश्वास यांनी आज शिर्डीत हजेरी लावून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की  दिल्लीच्या राज्य निवडणूक आयोगाने आपच्या तीन वर्षांच्या कालखंडानंतर आमच्या विधानसभेच्या २० सदस्यांवर निलंबनाची नोटीस काढली आहे. त्याचा निर्णय राष्ट्रपतींच्या अखत्यारित आहे. त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तरी आमच्या पक्षाच्या २० च्या २० जागा पुन्हा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र त्या वेळी त्यांना तेथे पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे शल्य बोचत असल्याचे जाणवले म्हणून ते म्हणाले, या प्रकारानंतर आमच्या पक्षाचे नेते माझे फोन उचलत नव्हते. मला पक्षाच्या गटातून बाहेर काढण्यात आले होते. ज्या सदस्यांची निलंबनाची नोटीस आली आहे, त्यांच्यासाठी खूप प्रचार केला होता. सभा, बठकाही घेतल्या होत्या.  राज्य निवडणूक आयोगाने केलेली ही कारवाई फारच क्लेशदायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मात्र असे असतांना जर पुन्हा या जागांसाठी पक्षाला निवडणुकीच्या सामोरे जावे लागले तर आमच्या पक्षाचे भष्ट्रचार विरोधी नेते सुशील गुप्ता व नारायणदास गुप्ता हे दोन मोहरे आमच्याकडे आहेत. त्यांच्या भरोशावर आम्ही त्या उमेदवारांच्या प्रचाराची पुन्हा नव्या जोमाने सुरवात करू व २० उमेदवारांना निवडून आणू असे स्पष्ट केले. मोदींच्या विरोधात केजरीवाल नेहमी बोलत असतात, मात्र या प्रकरणात त्यांनी मोदींना लक्ष्य का केले नाही, यावर ते म्हणाले की, वेळ आल्यावर ते निश्चितच बोलतील. त्यांनी बोलले पाहिजे. शनिची वक्रदृष्टी पक्षावर पडली आहे का, यावर ते म्हणाले की, नाही, मात्र शनि देव ऊर्जा देतात. ते कोणचंही मंगलच करतील. मात्र या परिस्थितीचा फायदा कॉंग्रेस घेऊ शकेल असे वाटत नाही. साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -