चंद्रकांत पाटलांच्या घरावर सीमावासीयांचा मोर्चा

- Advertisement -

कोल्हापूर  कर्नाटकचा गौरव करणारे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ सीमावासीयांनी आज कोल्हापुरात जोरदार मोर्चा काढला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे कार्यकर्ते पाटील यांच्या घराबाहेर निदर्शने करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड झटापट झाली. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने अखेर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील कार्यक्रमात कन्नड गीत गायल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे बेळगावहून आलेल्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये आज आंदोलन करत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. समितीच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज पाटील यांच्या जुनी मोरे कॉलनी येथील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी संभाजीनगर बस स्थानक ते संभाजीनगर पेट्रोल पंपसमोरील चौकालगतच्या हॉटेल समाधानपर्यंत मोर्चा काढला. पण पोलिसांनी पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरेकटस टाकून आंदोलकांचा मोर्चा वाटेतच अडवला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जिल्हा पोलस अधीक्षक संजय मोहिते हे स्वत: बंदोबस्तावर नियंत्रण ठेवून होते.

‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ आणि ‘बेळगाव बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पाटील यांचे हे खासगी निवासस्थान असल्याचं कारण पुढं करत पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन करण्यास मनाई केली. मात्र ‘आम्ही बेळगावहून आलो आहोत, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. तोंडावर काळ्या पट्टा बांधून पालकमंत्र्याच्या निवासस्थान परिसरातून मूक मोर्चा काढतो,’ अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. मात्र पोलीसांनी त्याला परवानगी दिली नाही. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी सीमा लढ्याचा दाखला देत घोषणेबाजी केली. या मोर्च्यात एकीकरण समितीचे पदाधिकारी मदन बामणे, सूरज कणबरकर, पियुष हावळ, सुनील बाळेकुंदी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकार आदींसह ४० कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.

- Advertisement -