छावणीत मोकाट कुत्र्याने दोन बालकांचे लचके तोडले!

- Advertisement -

औरंगाबाद: छावणी परिसरात नागरिकांमागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. नागरिक गॅस्ट्रोच्या महाभयंकर धक्यातून सावरत असतांना आज दुपारी मोकाट कुत्र्याने दोन बालकांचे लचके तोडले. यामुळे परिसरात पुन्हा दशहत निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेख हनीफ यांच्या वॉर्ड क्रमांक ५ पेन्शनपूरा येथे घडली.

आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ शेख सोहेल(४),शेख बाबा या(४) दोन्ही मुलांचे मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याची घटना घडाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांवर घाटीत उपचार सुरु आहे. छावणी परिसरात गॅस्ट्रोने हजारो नागरिकांना आपल्या साथीचे जाळ्यात ओढून घेतले होते. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात आजही भीती आहे. नागरिकांनी निवेदन देऊन,तसेच छावणी बंद करुन छावणी परिषदेच्या कारभाराचा निषेध केला होता. त्यानंतर सर्व प्रकरणाची साधी चौकशीही झाली नाही. हे प्रकरण ताजे असतांना मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याची घटना घडाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत. मोकाट कुत्र्याविषयी नागरिकांनी छावणी परिषदेत एक महिण्यापूर्वीच तक्रार केली होती. मात्र त्याकडे छावणी परिषदेने दुर्लक्ष केले. आज परिसरातील नागरिकांनी छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विजय कुमार बालन नायर यांच्याकडे तक्रार केली. नायर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

छावणीतील कारभार देवावरच…

- Advertisement -

छावणी परिषदेला नागरीकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही. गॅस्ट्रोच्या धक्यातून आम्ही सावरत असतांना पुन्हा मोकाट कुत्र्यांनी लहान बालकांचे चावे घेतले. ही गंभीर बाब आहे. छावणी परिषदेच्या रुग्णालयात रेबीज च्या इंजेक्शनची व्यवस्था नाही. तसेच परिषदेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग शूटर चे पद आहेत. परंतु त्यापदावर कर्मचारी घेतलेला नाही. असा भोंगळ कारभार सुरु आहे.
मयांक पांडे,सदस्य छावणी विकास युवा मंच

- Advertisement -