जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकीन हा आपला मुलभूत हक्क – खासदार सुप्रिया सुळे

- Advertisement -

मुंबई – सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करते मात्र महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सॅनिटरी नॅपकीन जर जीएसटी मुक्त होणार नसेल तर सरकारचा किती खोटारडेपणा आहे हे स्पष्ट होत असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

संक्रांतीचा काळ हा महिलांसाठी विशेष आहे. आणि या कालावधीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वत:च्या आरोग्यासाठी न्याय मागतात ही महत्वाची बाब असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. जीएसटी  संदर्भात महत्त्वाची बैठक आज दिल्लीत सुरू आहे त्यामुळे आजचा हा मोर्चा महत्वाचा आहे. सॅनिटरी पॅडवरील जीएसटी रद्द करावा यासाठी सातत्याने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. महिला सबलीकरणाच्या सर्व महत्वाच्या निर्णयात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकीनसाठी आपण लढा देवू. हा फक्त महिलांचा प्रश्न नाही. या आपल्या लढ्यात संघटनेतले सर्व पुरूषही उपस्थित आहेत हेच समानतेचं लक्षण आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सॅनिटरी नॅपकीनवर लावलेला जीएसटी रद्द करावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-माझगाव येथील सेल्स टॅक्स कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी स्पेशल कमिशनर पराग जैन यांना निवेदन देवून सॅनिटरी नॅपकीनवरील  जीएसटी  रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, नगरसेवक आणि आरोग्य समिती सदस्य डॉ. सईदा खान, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 ही लढाई बॅडमॅनच्या (सरकार) विरोधात – सचिन अहिर

आपली लढाई ही बॅडमॅन म्हणजेच सरकारच्या विरोधात असल्याचे वक्तव्य मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले. पॅडमॅन या नवीन चित्रपटाचा नायक महिलांनी मासिक पाळीत स्वच्छता राखावी यासाठी प्रयत्न करतो तर आपले सरकार त्यावर जीएसटी लादून महिलांवर अन्याय करत असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले. ही विचारांची लढाई आहे. जोपर्यंत सॅनिटरी पॅडवरील कर हटवला जात नाही तोपर्यत राष्ट्रवादी काँग्रेस ही लढाई लढेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेच्या रूग्णालयात मोफत सॅनिटरी पॅड असणाऱ्या मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आग्रही राहतील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -