ट्रक-कार धडकेत सत्संगासाठी जाणारे ३ भाविक ठार

- Advertisement -

बुलडाणा – राधास्वामींच्या सत्संगासाठी जाताना ट्रक आणि कारच्या अपघातात ३ भाविक ठार झाले, तर ३ गंभीर जखमी झाले. ही घटना मलकापूरजवळील तळसवाडा येथे रविवारी रात्री घडली आहे. नवीन परसराम तुलसाणी, रुमा महेशलाल तुलसाणी, करिश्मा महेशलाल दुसेजा असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत.

धुळे येथून अकोल्याकडे जाणारी मारोती वॅगन आर कार ( एमएच ०१ एआर ४७०५ ) आणि अकोल्याकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक ( जीजे ०३ एटी २७०७ ) मध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात मारोती वॅगन आर कारचा चुराडा झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या धुळे येथील तुलसानी परिवारातील नवीन परसराम तुलसाणी ( वय २२ ) रुमा महेशलाल तुलसाणी ( वय ४० ) आणि करिश्माला महेशलाल दुसेजा ( वय २० ) हे तिघे जागीच ठार झाले. तर निशा तुलसाणी ( वय ५० ), जुही तुलसाणी ( वय १३ ) , भूमी तुलसाणी ( वय १४ ) हे गंभीररित्या जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, दसारखेड एमआयडीसीचे पोलीस ठाण्याचे ठाणेदार माधव गरुड, आदींनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेत जखमींना प्रथम मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. अकोला येथे आयोजित राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हा परिवार जात असताना तुलसाणी परिवारावर काळाने हा घाला घातला.

- Advertisement -