ठाण्यात १८ नोव्हेंबरला राज’गर्जना’!

- Advertisement -

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या १८ नोव्हेंबरला शनिवारी ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेमधून राज ठाकरे फेरीवाल्यांसह राज्यासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करतील. सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी मनसेने फेरीवाल्यांचे सामना उलथवून लावत पिटाळून लावले. त्यामुळे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला. 

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवालाविरोधी आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीरसभाही ठाण्यामध्येच होणार आहे. राज ठाकरेंनी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथ अडवून ठेवल्याने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हटवले. फेरीवाल्यांना हुसकावून लावल्यानंतर एक-दोन दिवस रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा दिसला. पण आता पुन्हा पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आता कुठली भूमिका घेतात याची उत्सुक्ता आहे. महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी कमालीची उत्सुक्ता आहे. राज ठाकरे शिवसेनेबद्दल काय बोलणार याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष असेल.

- Advertisement -
- Advertisement -