‘त्या’ कीटकनाशक विकणाऱ्यांवर,कंपनीवर गुन्हे दाखल करा : मुख्यमंत्री

- Advertisement -

यवतमाळ :  बंदी असलेले कीटकनाशक सापडल्यास संबंधित विक्रेता किंवा कंपनीवर गुन्हे दाखल करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर दया माया दाखवू नका, असे त्यांनी म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही मुख्यमंत्र्यांना यवतमाळचा दौरा करण्यास वेळ मिळाला नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. शेवटी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळचा दौरा केला. या दौऱ्याविषयी गोपनीयता बाळगण्यात आली. मोजक्याच अधिकाऱ्यांना दौऱ्याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. रविवारी सकाळी मुख्यमंत्री यवतमाळमध्ये आले. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार सुरु असलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी सांत्वन केले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणातील दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. सरकारच्या आदेशानंतरही बंदी असलेले कीटकनाशक विकणारे विक्रेते आणि कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीनंतर फडणवीस यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी रुग्णालयाला ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गही सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -