नांदेडमध्ये ८१ वॉर्डांसाठी आज मतदान, ५७८ उमेदवार मैदानात

- Advertisement -

नांदेड – नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू झाले. गुरुवारी मतमोजणी होईल. मतदानासाठी २,५०० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या आहेत. १३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. विविध पक्षांचे ४२३ तर १५५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात पहिल्यांदा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात (व्हीव्हीपॅट) मशीनचा वापर होणार आहे.

नांदेड महापालिकेची स्थापना २६ मार्च १९९७ रोजी झाली असून आतापर्यंत चार निवडणुका झाल्या आहेत. ऑक्‍टोबरमध्ये पाचवी निवडणूक होत आहे. महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता होती. त्यामुळे नांदेड महापालिकेतही शिवसेनेने बाजी मारत भाजप, अपक्ष आणि इतरांशी हात मिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली आणि शिवसेनेचे सुधाकर पांढरे प्रथम महापौर झाले. मात्र, त्यावेळी एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात सत्ता गेली तेव्हापासून काँग्रेसचेच महापौर झाले असून सध्या काँग्रेसच्या शैलजा स्वामी या महापौर आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी ते काठावरचे बहुमत होते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीची मदत घेत सत्ता स्थापन केली आणि पाच वर्षे सत्ता टिकवून ठेवण्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना यश मिळाले होते.ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या होमपीचवर ही निवडणूक होत असल्यामुळे त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

- Advertisement -
- Advertisement -