फेरीवाल्यांच्या रोजगारावर लाथ मारण्याचा प्रश्नच कुठे येतो?- राज ठाकरे

- Advertisement -

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोर्चानंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाऱ्या अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

- Advertisement -

मनसेच्या भूमिकेमुळे फेरीवाल्यांच्या रोजगारावर गदा येत आहे. यामध्ये अनेक मराठी फेरीवाल्यांचाही समावेश आहे, त्यांचे काय?, असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राज यांनी म्हटले की, या सगळ्यात कोणाच्याही रोजगारावर लाथ मारण्याचा प्रश्नच येत नाही. रेल्वे पुलावरून किंवा फुटपाथवरून चालताना फेरीवाल्यांमुळे लोकांची गैरसोय होत असेल तर ते मान्यच करायला हवे. प्रत्येकालाच आपलं शहर चांगलं असावं असं वाटतं, त्याचा संबंध रोजगार हिरावून घेण्याशी जोडणे योग्य नाही, असे राज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्त अजॉय मेहता यांना आपला प्रस्ताव आवडल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच त्यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती राज यांनी दिली.

- Advertisement -