Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रभार्इंदरमध्ये साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ ऑक्टोबरला आयोजन

भार्इंदरमध्ये साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ ऑक्टोबरला आयोजन

भार्इंदर: शिर्डीच्या साईबाबांच्या महासमाधीचे यंदा शताब्दी वर्ष साजरे केले जात असून मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील साईभक्तांना साईबाबांचे दर्शन घेता यावे, याकरीता श्री सिद्धी विनायक न्यास, मुंबई व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने श्री साई भक्त मंडळाच्या वतीने भार्इंदर येथील जेसलपार्क चौपाटी मैदानात श्री साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ ऑक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात पत्रकार पत्रपरिषदेत दिली.

यावेळी मंडळाचे सहसचिव संदेश जाधव, सदस्य अशोक मुळे उपस्थित होते. यापुर्वी हे संमेलन मुंबईतील वरळीच्या जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आले होते. यंदा साईबाबांच्या समाधीचा शतकमहोत्सव शिर्डीला साजरा केला जात असताना त्यांच्या दर्शनासाठी देशभरातुन येणा-या भाविकांची शिर्डीला प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे भक्तांना साईबाबांचे दर्शन काही अंतरावरुन मिळत असल्याने त्यांना प्रत्यक्ष मुर्तीच्या जवळ जाऊन त्यांचे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी पसरत असल्याने भक्तांच्या सोईसाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी साईबाबांच्या मुर्तीसह त्यांच्या पादुकांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी ७ वाजता साईबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे याच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता होमहवन व धुनीपुजन , सकाळी ९ वाजता १०० जोडप्यांकडुन महाभिषेक करण्यात येणार आहे.
तद्नंतर सकाळी ११ वाजता राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, महंतपीर भाईदास महाराज, आ. आदेश बांदेकर, आ. हितेंद्र ठाकूर, आ. आशिष शेलार, आ. नरेंद्र मेहता, आ. संजय केळकर, मीरा-भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर आदींच्या उपस्थितीत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ११.४५ वाजता श्री साईनाथ स्तवन मंजिरी पठण मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद आप्पा तर मध्यान्ह आरती माजी मंत्री सुनिल तटकरे, सचिन अहिर, आ. क्षितिज ठाकूर आदींच्या हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर श्री साईचरित ग्रंथाचे ११ पोथ्यांचे २४ तासांचे अखंड पारायण, साई भंडारा, श्री साई पालखी व रथाची मिरवणुक आदींचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. संमेलनात साईबाबांसोबत राहिलेले काका दिक्षितांचे नातू अनिल दिक्षित, गोपाळराव बुट्टींचे नातू सुभाष बुट्टी, कृष्णराव भीष्मांचे नातू प्रमोद भीष्म आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणुन उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी मध्यान्ह आरती पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील शेकडो साईभक्तांच्या पालख्या संमेलनात आणल्या जाणार असुन साईदर्शनासाठी येणा-या हजारो भक्तांची संख्या व त्यांच्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन संमेलनात विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कांगणे यांनी पत्रपरिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments