मुंबईत लवकरच आमचा महापौर’- सोमय्या

- Advertisement -

मुंबई : मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे. ‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना ८४ आणि भाजप ८३ अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप ८४ आणि शिवसेना ८३ अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे.

शिवसेनेवर टीका करतानाच सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा आता तरी कमी होणार का?’ असं म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर बरीच टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मात्र, भांडुप पोटनिवडणुकीतील पराभवनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे. ‘कंत्राट माफियावरुन एवढे आरोप झाले तरी, ‘हम नहीं सुधरेंगे’ अशी शिवसेनेची प्रवृत्ती आहे. त्यामुळेच हा पराभव झाला आहे.’ अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, महापौरपदासाठी काही नवी रणनीती आखणार का? याबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘पिछली बार तो उनको छोड दिया था… आता लवकरच संख्याबळ त्यांच्या पुढे नेणार आणि त्यानंतर आमचा महापौर बसवणार.’ भांडुपमधील पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपनं बरीच प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीती विजयानं पालिकेतील संख्येचं समीकरण सध्या बदललं आहे. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या बराच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता सोमय्या यांच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या पराभवरुन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर आता सोमय्या यांनीही निशाणा साधला आहे.

- Advertisement -