शरद पवार, सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूरमधून अटक

- Advertisement -

महत्वाचे….

१.जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती २.बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार ३. गिते हा कोणत्या पक्षाशी संघटनेशी संबधित आहेत तपास सुरु


नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वालचंद गिते (३४) असे या तरुणाचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. धंतोलीत राहणाऱ्या वालचंद फुलचंद गितेने (वय ३४) १५ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जगदीश पंचबुद्धे आणि राहुल कामळे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०० आणि ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ कलमातर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी गितेला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. वालचंद गितेने कृषी विषयात बीएससी केले असून तो विवाहित आहे. त्याला दोन लहान मुलंही आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्त्री ही कोणाची तरी आई, बहीण, मुलगी असते याचे भान ठेवा. स्त्रीयांबद्दल आदर राखायला तरी शिका, असे आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे. कायदा हातात घेऊन तुला धडा शिकवू असा इशाराच आव्हाड यांनी गितेला दिला आहे.

- Advertisement -