शहीद मिलिंद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

- Advertisement -

नाशिक/ नंदुरबार-शहीद मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव बोराळे (जि.नंदूरबार) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात खान्देशच्या विरपुत्राला निरोप देण्यात आला. मिलिंद यांना निरोप देताना तापीकाठही गहीवरला. गावकऱ्यांनी अंत्ययात्रेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना वायुसेनेचे गरुड कमांडो मिलिंद किशोर खैरनार यांना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने आज (गुरुवारी) सकाळी १० वाजता ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. विमानतळावर लष्करी इतमामात वायुसेनेच्या अधिकार्‍यांकडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधीक्षक संजय दराडे, शहीद जवानाचे बंधू मनोज खैरनार यांच्याकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी वीरपत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, मुलगा कृष्णा उपस्थित होता. नंतर लष्कराच्या वाहनातून मिलिंद यांचे पार्थिव त्यांचे मूळगाव बोराळे (जि.नंदुरबार) येथे आणण्यात आले.

साक्रीकरांकडून वीरपुत्र मिलिंद खैरनार यांना श्रद्धांजली
खान्देशचा वीर सुपुत्र मिलिंद खैरनार यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनातून नाशिकहून त्यांच्या मूळगावी बोराळे येथे रवाना झाले आहे. यादरम्यान साक्री येथे वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मिलिंद यांचे साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झाले. साक्री येथे काही वेळ अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात आले होते. यावेळी अवघे साक्री शहर आणि परिसर या वीर सुपुत्राला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी एकवटला होता.

- Advertisement -

न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात मिलिंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत सर्व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी विविध संघटना तसेच सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे उपस्थित होते.

अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत मिलिं खैरनार यांना आले वीरमरण…
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे २ गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार (३३) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात २७ वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले आहेत. याआधी २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यात एक गरुड कमांडो शहीद झाला होता.

- Advertisement -