शिवसेना आता गुजरातमध्येही भाजपला भिडणार!

- Advertisement -

मुंबई:राज्यात भाजपसोबत सत्तेत असूनही अनेकदा भाजपला आव्हान देणाऱ्या शिवसेनेने आता पंतप्रधान मोदींच्या होम ग्राऊंडमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना गुजरात विधानसभा निवडणुकीत ५० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. गुजरातचा बालेकिल्ला राखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र आता शिवसेनेने मोदींच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊन त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

शिवसेनेने आधी गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र आता शिवसेनेने घूमजाव करत गुजरातमध्ये निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. याशिवाय नगरसेविका राजूल पटेल आणि हेमराज शहा यांच्या नेतृत्त्वाखाली एक टीम गुजरातला रवाना होणार आहे. गुजरातमधील परिस्थिती आणि लढवण्यात येणाऱ्या जागांचा आढावा घेण्याचे काम या टीमकडून करण्यात येणार आहे. ‘शिवसेनेकडून गुजरातच्या सूरत आणि राजकोटमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार केले जाणार आहेत. या भागात मराठी भाषकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत,’ असे राजूल पटेल यांनी सांगितले.

- Advertisement -

गुजरातमध्ये कुणासोबतही आघाडी किंवा युती करणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. ‘पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्याशी शिवसेनेचे चांगले संबंध आहेत. मात्र तरीही कोणताही निर्णय उद्धव ठाकरेंकडूनच घेतला जाईल,’ असेही त्या म्हणाल्या. गुजरातमध्ये भाजपला आव्हान देण्याच्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. शिवसेना हिंदुत्त्ववादी मतांमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झाल्यास त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो.

- Advertisement -