Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले- राजेंद्र गवई

भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले- राजेंद्र गवई

अमरावती – भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी फ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.

कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर भारीप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात झालेल्या वाक्युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गवई यांनी रिपाइंची भूमिका मांडली. गवई यांच्या मते, आठवले आणि आंबेडकर हे दिग्गज नेते आहेत, यात दुमत नाही. मात्र, रिपाइं ऐक्यासाठी दोघांनीही पुढाकार घेतला, तर ते स्वागतार्ह असेल. फॉर्म्यूला कोणताही असावा, पण रिपाइंचे ऐक्य ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय ते ऐक्य नसेल, असेही गवई म्हणाले.
कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभर बंद पुकारला. त्यानंतर काही ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडल्या. हे कृत्य समाजकंटकांनी केले. यात रिपाइं कार्यकर्ता नव्हता, असे गवई यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी निरपराधांवर गुन्हे दाखल करून अन्यायकारक अटकसत्र चालविले आहे. कोरेगाव भीमा प्रकरण हे मराठा समाजाने पेटविले, असे मनुवादी प्रवृत्तीकडून पेरले जात आहे. मात्र, मराठा समाज गुन्हेगार असल्याचा एकही पुरावा नाही. मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष रंगविण्याचे षड्यंत्र या घटनेआडून सुरू असल्याचे राजेंद्र गवई म्हणाले. दंगलीमागे कुणाचा हात आहे, हे पोलिसांनी शोधून काढावे. संभजी भिडे, मिलिंद एकबोटे या घटनेमागे असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केला, तो सत्य आहे, असा दुजोरा गवई यांनी दिला.
कोरेगाव भीमा घटनेनंतर रिपाइं ऐक्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आधी आंबेडकर आणि आठवले यांच्यात सुरू असलेली चिखलफेक थांबावी, असे आवाहन गवई यांनी केले. अमरावतीत काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी आपण संबंधित व्यावसायिकांना भेटणार आहोत. रिपाइं हा समता प्रस्थापित करणारा पक्ष असून, सलोख्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाऊसाहेब ढंगारे, वसंतराव गवई, हिमंत ढोले, दीपक सरदार, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.

रिपाइं लोकसभा,विधानसभा निवडणूकीत काँग्रेससोबत जाणार
रिपाइं (गवई गट) हा काँग्रेससोबत राहील. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढणार असल्याचे राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments