Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा संताप

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा संताप

मुंबई – धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत सुनावलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे’.

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही हत्याच, सरकारच्या क्रुरतेचा हा बळी – धनंजय मुंडे

न्यायासाठी लढणा-या धर्मा पाटील यांचा मृत्यू नसून गेंड्याच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे. हा सरकारच्या क्रुरतेचा बळी असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतानाच हा धर्मावर भ्रष्ट्र सरकररूपी अधर्माचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे. सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले आहे.

धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, या प्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पासून ते जिल्हाधिकारी या सर्वांना निलंबित करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मंत्रालयात येऊन जीव दिल्यानंतर ही इथे न्याय मिळत नाही आणि म्हणे आपले सरकार. मर्जीतल्या कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजली ची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही ‘आपले सरकार’ सारखी पोर्टलची नाटके बंद करून टाका . जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश आता दिले, मग दोन वर्ष काय केले? असा सवाल धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. या सरकारच्या कार्यकाळात समृद्धी पासून ते सर्वच प्रकल्पासाठी संपादित केलेल्या  जमिनी , त्यांचा मोबदला एक मोठे भ्रष्ट्राचाराचे कांड असून यावर आपण आगामी अधिवेशनात आवाज उठवू असेही मुंडे म्हणाले. औरंगाबाद येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले असतांना ते बोलत होते.

सुनील तटकरे

सरकारने अन्याय केला तरी ते शेवटपर्यंत आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी झगडत राहिले. धर्मा पाटील यांचे दुःखद निधन होणे या सरकारसाठी लाजिरवाणे आहे. आता कुणावर ३०२ दाखल करायचा? धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

राधाकृष्ण विखे पाटील

धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी… त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली… हा सरकारी अनास्थेचा बळी आहे… या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्‍यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक…

धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटीलजमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा सरकार लेखी आश्वासनात देणार नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.
मृत्यूनंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी अवयवदानाचा फॉर्म भरुन दिला होता.

भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची ६०० झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ लाखांचा मोबदला देण्यात आला.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना १५ लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री८४ वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूने अत्यंत दु:ख जालं. धर्मा पाटील यांनी असंवेदनशील आणि  उदासिन सरकारविरोधात लढा दिला. कर्जमाफीची धूळफेक, शेतमालाला भाव नाही, जमिनी संपादनाची क्रूर प्रक्रिया आणि तुटपुंजी भरपाई या सर्वाने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. या संपूर्ण प्रकरणाची न्यायलयीन चौकशी व्हावी- पृथ्वीराज चव्हाण


अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चुकलं असेल तर धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ : बावनकुळेशेतकरी धर्मा पाटील यांचा जमीन संपादनाच्या बाबतीत चूक झाली असेल तर त्यांना व्याजासह मोबदला देऊ. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात येईल,” अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

धर्मा पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार जागं झालं आणि नागपुरात पत्रकार परिषद घेऊन बावनकुळे यांनी मदतीचं आश्वासन दिलं. धर्मा पाटील यांच्या मुलांशी बोलून सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं त्यांना सांगितलं असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments