Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेलोकसेवा आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

लोकसेवा आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

पुणे: लोकसेवा आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत आज पुण्यातील विद्यार्थांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला. शनिवारवाड्यापासून सुरु झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

आयोगाच्या मनमानी कारभाराला कंटाळेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांचाही पाठपुरवठा केला. राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीसारखी पीएसआय, सीटीआय आणि एसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हाजेरी घ्यावी याबरोबरच परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवण्यात यावेत अशा काही प्रमुख मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी न लावता तामिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी पदाची जाहिरात काढून ती परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्यात यावी, स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.

मागील चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. यामध्ये अनेक अनुभव आले असून आम्ही केलेल्या मागण्याची दखल राज्य सरकारने घ्यावी. अन्यथा भविष्यात हाच तरुण वर्ग अधिक तीव्र स्वरूपात लढा उभारेल; असा इशारा या मोर्चामध्ये सहभागी झालेले स्पर्धा परीक्षा देणारे दशरथ साळूंखे यांनी दिला.

नागपूरमध्येही निघाला मोर्चा

पुण्याबरोबरच नागपुरमधील स्थानिक तरुणांनीही लोकसेवा आयोगाविरुद्ध रस्त्यावर उतरत मोर्चाचे आयोजन केले. मुख्यमंत्र्यांचा गड असलेल्या नागपूरमधील या मोर्चात हजारोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

मुंडेंचा पाठिंबा
विधानपरिषदेचे मुख्य विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे ट्विट करून सांगितले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना सरकार विरोधात संघर्ष आणि आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या आंदोलनास आणि विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यास आपला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments