Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादवा रे सरकार !...आयजीच्या जीवावर बायजी उदार...अजितदादांनी सरकारवर डागली तोफ

वा रे सरकार !…आयजीच्या जीवावर बायजी उदार…अजितदादांनी सरकारवर डागली तोफ

जालना: बोंडअळीने कापूस शेतकरी हैराण झाला असताना निकृष्ट बियाणं देणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेवून सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे. वा रे सरकार!… आयजी जीवावर बायजी उदार अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाफराबादमधील जाहीर सभेत सरकारवर केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांच्या मुलाचा मतदारसंघ आहे. परंतु इथे साडेतीन वर्षात कोणतेच विकास काम झालेले नाही.तुम्ही आपल्या विचारांचा नेता निवडून देत नाही म्हणून तुमचा विकास थांबतो आहे. माझ्या बारामती मतदार संघात मी सातवेळा मोठया संख्येने निवडून येत आहे.मग कुणाची लाट येवू दे किंवा नको येवू दे.लाखाच्या मताधिक्याने निवडून येत आहे.कारण लोक आमच्या पाठीशी आहेत.तसे इथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या मागे उभे रहा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

राज्यातील शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा दैनंदिन संकटे आली त्यावेळी आदरणीय शरद पवार साहेब पाठीशी राहिले आहेत. त्यांनी ७१ हाजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली परंतु आत्ताचे सरकार शेतकऱ्यांना काहीच देत नाही फक्त आश्वासनापलिकडे असा हल्लाबोलही केला.

राज्यातील तरुणांची अवस्था काय आहे.नोकरीचे वय निघून चालली आहे.नोकरी नाही आणि बायकोही नाही  अशी अवस्था तरुणाची झाली आहे.उदयाचं भविष्य असलेल्या माझ्या या तरुणांच्या भावनांशी का खेळात असा संतप्त सवाल अजितदादांनी केला.इथल्या पूर्णा नदीवर होत असलेल्या बेकायदा वाळू उपसाबाबत अजित पवार यांच्याकडे स्थानिक नेत्यांनी विषय नेल्यावर अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला. वाळू काढण्यासाठी हे सत्तेवर आले आहेत.पाण्याचा स्त्रोत असलेल्या पूर्णा नदीला अशी वाळू काढून संपवू नका असे आवाहन त्यांनी केले. इथल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाचा चांगलाच समाचार घेतला.ही काय हुकुमशाही आहे की मोघलाई असा संतप्त सवाल करत एकप्रकारे भाजपच्या नेत्यांना इशाराच दिला.

सभेमध्ये माजी मंत्री राजेश टोपे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी आपले विचार व्यक्त केले.सभेच्या सुरुवातीला अजितदादांचे जंगी स्वागत करण्यात आले.तरुणांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत ताकद दाखवून दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा हा नववा दिवस असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात जबरदस्त मोठी सभा घेतली.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील,माजी मंत्री राजेश टोपे, खासदार माजीद मेमन, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार जयदेव गायकवाड, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार चंद्रकांत दानवे,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक,जाफराबाद तालुकाध्यक्ष राजू पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा माने आदींसह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments