Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी 162 वैद्यकीय पथके कार्यरत-आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

पुरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी 162 वैद्यकीय पथके कार्यरत-आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पुर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 14 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोकण भागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली,सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तसेच विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस असून अन्य भागातही पावसाचा जोर कमी -अधिक प्रमाणात आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 14 हजार लोकसंख्या पुरग्रस्त असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून येत आहे. त्यापैकी सर्वाधिक गावे कोल्हापूर विभागात 36 तर ठाणे विभागात 18 असून सातारा आणि नाशिक येथे अनुक्रमे 3 व 2 गावे पुरग्रस्त आहे.

पुर ओसरल्यानंतर त्या भागात साथीच्या आजारांचा फैलाव होतो. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी पथके कार्यान्वित आहेत. ठाणे मंडळामध्ये 114 वैद्यकीय पथक कार्यरत आहेत. कोल्हापूर मंडळात 37, पुणे 10अशी राज्यभर सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधक उपाययोजनांबाबत  सविस्तर सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत पुरग्रस्त भागातील सुमारे 40 विहीरींचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरीनच्या गोळ्या, आणि क्लोरीन द्रव यांचा वापर करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

कोकण विभाग, नवी मुंबई, ठाणे, मुंबई या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथे पावसाचे पाणी साचल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने स्थानिक महापालिकेच्या सहकार्याने डास उत्पत्ती रोखण्याकरीता धूर आणि औषध फवारणी करावी. पुराच्या अथवा पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पायी चालत गेलेल्या नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करावे. पूरग्रस्त भागात आणि पावसाचे पाणी साचलेल्या वसाहतींमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

साथरोगांवरील औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. स्वाईन फ्लूवरील उपचाराच्या सुमारे नऊ लाख गोळ्या उपलब्ध असल्याचा दिलासा देतानाच लेप्टोवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments