शिवसेना नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड

- Advertisement -

मुंबई: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेते पदी आज निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा आज वरळी येथील वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल येथे सुरू आहे. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेते पदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण सभागृहात जल्लोष झाला. तसेच जोरदार फटाके वाजण्यात आले. यावेळी शिवसेना झिंदाबाद आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

आज सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वेळी सर्वप्रथम सर्वप्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ४ डिसेंबर, २०१७ रोजी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी (शिवसेना नेते) बैठकीचा इतिवृत्तांत प्रतिनिधी सभेसमोर मांडण्यात आला. सदर बैठकीतीलल निर्णय झालेल्या ठरावाचे वाचन करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. ठराव सूचक म्हणून रामदास कदम आणि अनुमोदक म्हणून गजानन कीर्तिकर यांनी काम पाहिले.

राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे प्रतिनिधीसभेचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारी निवडणूक २०१८ करता शिवसेना नेते पदासाठी नामांकन अर्ज ९ जानेवारी २०१८ रोजी भरला होता. त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

- Advertisement -

शिवसेना नेते पदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा होताच सभास्थळी एकच जल्लोष झाला. सर्व सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सभा मंडपाच्या बाहेर शिवसैनिकांनी फटाकेही वाजवले. सभा मंडपाच्या बाहेर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे बोर्ड झळकले.

- Advertisement -