अखेर…लष्कराकडून एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे बांधकाम सुरु!

- Advertisement -

महत्त्वाचे…..
१. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत या नव्या पूलाचं काम पूर्ण करण्याचा संकल्प, २.एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर नव्या पूलाच्या कामाला सुरूवात, ३. भारतीय लष्कराकडून काम होत असल्यामुळे सर्वांच्या नजरा बांधकामाकडे.


मुंबई : एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पूलावार झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नव्या पूलाचं काम आजपासून सुरू झालं आहे. मुंबईसह देशाला हादरवून सोडणा-या घटनेनंतर या स्टेशनच्या पूलाचे काम लष्कराच्या हाती सोपवण्यात आलंय. विशेष म्हणजे काम सोपवून जेमतेम आठवड्याभरातच पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली.

३१ जानेवारी २०१८ पर्यंत या नव्या पूलाचं काम पूर्ण करण्याचा विडा लष्करानं उचलला आहे. अंमलबजावणी लष्कराच्या हाती असल्यानं तातडीनं या कामाला सुरुवात झाली असून प्रवाशांना पुढच्या काही दिवसातच एक मोठा दिलासा मिळेल याबाबत खात्री बाळगण्यास हरकत नाही. दरम्यान, या स्टेशनवर झालेल्या घटनेनंतर नागरिकांच्या मोठ्या संतापाचा सामना सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला करावा लागला. तर मनसेकडूनही यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र आता पूलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या स्टेशनवरील गर्दीचा प्रश्न यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्यांची दखल घेत प्रवासी सुरक्षिततेनुरूप बदल करण्यास सुरूवात केली आहे. सर्व स्थानकांत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर पादचारी पुलासाठी २४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खळबळून जागं झालं असून विविध कामांना हिरवा कंदील दिला आहे. पादचारी पुलावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या डब्ब्यात टॉकबॅक यंत्रणा १५ महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. एक महिना उशिरा का होईन या कामांना सुरूवात झाली आहे.

- Advertisement -