Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा अग्नितांडव: अंधेरीत इमारतीच्या आगीत चौघे ठार

पुन्हा अग्नितांडव: अंधेरीत इमारतीच्या आगीत चौघे ठार

मुंबई: कमला मिल कंम्पाऊंडमध्ये आग लागल्याची घटना ताजी असतानाच अंधेरी येथील मरोळ भागात मेमून मंझिल या ४ मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याला मध्यरात्री आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी आहेत. मृतांमध्ये १ पुरुष, १ महिला तर दोन मुलांचा समावेश आहे.

बोरी कॉलनीत मरोळ चर्चजवळ ही इमारत आहे. ५ जखमींवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. ६ जण या आगीत अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ६ जणांना आगीतून बाहेर काढले. गंभीर भाजलेल्या चौघांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. दाऊद अली कपासी (८०), तस्लीम अपासी कपासी (४२), सकीना अपासी कपासी (१४) आणि मोहीन अपासी कपासी (१०) अशी मृतांची नावे आहेत. कपासी कुटुंबीयांचा आगीत दुर्देवी अंत झाला तर शेजारचे कोठारी कुटुंबीय जखमी आहेत. इब्राहिम कोठारी, सकीना कोठारी, हुसेन कोठारी, हजीफा कोठारी आणि झारा कटलरीवाला अशी जखमींची नावे आहेत.
आग लागल्यानंतर घरात अडकलेलं हे कुटुंब बचावासाठी खिडकीत उभं राहून ओरडत होतं. जीवाच्या आकांताने त्यांनी ‘वाचवा वाचवा’चा टाहो फोडला, मात्र आग प्रचंड असल्याने त्यांना वाचवण्यासाठी कोणीच आत जाऊ शकलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत हे चौघेही जण गंभीररित्या भाजले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रात्री बारा साडेबाराच्या आसपास शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments