अनिकेत खून प्रकरण: युवराज कामठेसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी

- Advertisement -

महत्वाचे…
१.सीआयडीच्या हाती आरोपींविरोधात सक्षम पुरावे २. आतापर्यंत १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले ३. १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींनी तपासात दाखवले असहकार्य


सांगली: अनिकेत कोथळे हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह ५ जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची आता कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.

१५ दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींनी तपासात कोणतेही सहकार्य दाखवलेले नाही. ‘आम्ही काहीही केलेले नाही, आम्हाला काहीही माहिती नाही’ असे उत्तर कामटे मागील १५ दिवसांपासून देत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच आरोपींविरोधात सक्षम पुरावे हाती लागले असून, ९० दिवसांत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, प्रमुख आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह ५ जणांना न्यायालयाने यापूर्वी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

- Advertisement -