Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeविदर्भनागपूरशेतकरीविरोधी सरकारचा विरोधी पक्षांनी केला निषेध

शेतकरीविरोधी सरकारचा विरोधी पक्षांनी केला निषेध

नागपूर : शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…शेतकऱ्यांची कुचेष्टा करणाऱ्या सरकारचा निषेध असो…शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… धिक्कार असो धिक्कार असो भाजप-सेना सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा देत विधानपरिषदेच्या आमदारांनी सभागृहाबाहेर येवून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

यामध्ये विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,आमदार सुनिल तटकरे,आमदार भाई जगताप, आमदार हेमंत टकले,आदींसह विधानपरिषदेचे सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

ज्या संवेदनशीलतेने विरोधी पक्षांनी बोंडअळीग्रस्त,धान उत्पादक,कृषी,वीज याचे प्रश्न २६० च्या प्रस्तावाद्वारे मांडले मात्र त्या संवेदनशीलतेने सरकारच्या मंत्र्यांनी उत्तर दिले नाही त्यामुळे सरकारचा निषेध करत विरोधी पक्षांनी काहीवेळेसाठी सभात्याग केला.

बोंडअळीमुळे उध्वस्त झालेल्या कापूस शेतकऱ्यांना २५ हजाराची हेक्टरी मदत देणार का? अशी मागणी आम्ही केली परंतु यावर सरकारने काहीच उत्तर दिले नाही. शरद पवार साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नितीन गडकरी,राधामोहन सिंग,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर एनडीआरआरएफकडे मदत मागितली गेली. पण ती मिळाली नाही ? याबाबतही माहिती दिली नाही. २७ शेतकरी किटकनाशक फवारणीमुळे मृत्युमुखी पडले त्यातील फक्त १८ शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत मिळाली आहे. याबद्दलही कोणताच उल्लेख मंत्र्यांनी केला नाही. एसएलबीसीने कर्जमाफी झालेल्या  शेतकऱ्यांची यादी सरकारकडे दिली असेल तर आज ती सभागृहात मांडायला पाहिजे होती. पण एसएलबीसीने यादीच सरकारला दिलेली नाही. इनोव्हेव कंपनीकडून कर्जमाफीत ऑनलाईन घोटाळा झालेला आहे. त्या कंपनीवर काय कारवाई करणार याचेही उत्तर आम्हाला दिले नाही. बोंडअळीमुळे कापूस तर उध्वस्त झाला पण हरभरा, ज्वारी यासारखी पिके वीज मिळत नाही त्यामुळे पाण्याअभावी वाया जात आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात असल्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध केला असे विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.

२६० च्या प्रस्तावावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,मंत्री सुभाष देशमुख आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तरे दिली परंतु ही उत्तरे विरोधी पक्षाच्या सदस्यांना असमाधानकारक वाटल्याने त्यांनी काहीकाळासाठी सभात्याग करत सरकारविरोधी विधानभवनाच्या परिसरामध्ये घोषणाबाजी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments