‘’पोलिसांना हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात नको ती कामं करावी लागत आहेत”

भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -
bjp-criticized-thackeray-government-demands-resignation-of-home-minister-anil-deshmukh
bjp-criticized-thackeray-government-demands-resignation-of-home-minister-anil-deshmukh

मुंबई: सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर काल(बुधवार) राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. याचबरोबर आता भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखील राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर टीका करणं सुरू केलं आहे.

- Advertisement -

“जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जातंय!” असं ट्विट भाजपाकडून करण्यात आलेलं आहे.

तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने प्रश्नांची भडीमार केला आहे. “वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का? हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही.

NIA चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का? इतके भयंकर कट रचणाऱ्याच्यांच हाती तपास… चोराच्या हातीच चाव्या देण्याइतके मजबूर का झालात गृहमंत्री? पोस्टमार्टेमचा रिपोर्ट, वाझेंचा कथित सहभाग, हिरेन यांच्या पत्नीचे आरोप या सगळ्यानंतर वाझेंच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं.

पण तसं का झालं नाही? वाझेंना ज्या अदृश्य शक्तींनी संरक्षण दिलं होतं, त्यांच्याच इशाऱ्यावर ATS काम करतंय. गृहखातं तुमच्याकडे खरोखरच आहे की तुम्ही फक्त नामधारी? उत्तर द्याल अनिल देशमुख? असे प्रश्न भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.

तर, “सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली होती.

ठाकरे सरकारने कारवाई केल्याचा आव आणू नये, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”

तसेच, “राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे.” अशी मागणी देखील  चंद्रकांत  पाटील यांनी केलेली आहे.

- Advertisement -