Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र‘अंडरटेकिंग च्या’ मोबदल्यात लाच मिळाली, पीएनबीच्या माजी व्यवस्थापकाची कबुली!

‘अंडरटेकिंग च्या’ मोबदल्यात लाच मिळाली, पीएनबीच्या माजी व्यवस्थापकाची कबुली!

मुंबई : ‘एलओयू अर्थात लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या मोबदल्यात मोठी लाच मिळत होती’, अशी कबुली पीएनबी बँकेचा माजी व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीनं दिली आहे. शनिवारी याप्रकरणी शेट्टीसह मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना सीबीआयनं अटक केली होती. त्यानंतर सीबीआयच्या चौकशीत गोकुळनाथ शेट्टीनं ही कबुली दिली.

गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये मनोज खरात हा एकमेव मराठी चेहरा असून तो अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता. सीबीआय न्यायालयानं १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानल्या जात असलेल्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँक अडकली आहे. एक हजार ७७१ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ११ हजार ३६० कोटींचा हा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. एलओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरवापर करुन हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती आहे.
पीएनबी ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची पाळंमुळं सात वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाल्याचं समोर आलं आहे. डायमंड किंग नीरव मोदी आणि गीतांजली जेम्स या दोन ग्रुप्सच्या नावाने पंजाब नॅशनल बँकेने लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) दिल्याचा आरोप आहे. गीतांजली जेम्स – जिली इंडिया आणि नक्षत्र, तसंच नीरव मोदी ग्रुप फर्म्स यांच्या वतीने एलओयू (LoU) किंवा एफएलसी (FLC- फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट) च्या आधारे अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेकडून कर्ज देण्यात आलं.
हाँगकाँग, दुबई, न्यू यॉर्कमध्ये नीरव मोदीची परदेशी केंद्रं आहेत. एलओयू दाखवून २०१० पासून नीरव मोदी क्रेडिटवर खरेदी करत असल्याचा संशय आहे.

एलओयू म्हणजे काय जाणून घेऊ या
एलओयू म्हणजे ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’. हे एकप्रकारे हमीपत्र असतं. हे पत्र एक बँक दुसऱ्या बँकेच्या शाखांना जारी करते. हमीपत्राच्या आधारे बँकेच्या परदेशी शाखा कर्जदारांना कर्ज किंवा क्रेडिट देतं.
या प्रकरणात, संबंधित बँकांच्या परदेशी शाखांचे नीरव मोदींच्या ज्वेलरी कंपनीच्या आऊटलेटसोबतच दृढ संबंध होते. त्यामुळे फ्रॉड एलओयू किंवा एफएलसीच्या आधारे त्यांनी क्रेडिट (कर्ज) दिलं.
लेटर ऑफ अंडरटेकिंग ही स्विफ्ट टेक्नॉलॉजीने देण्यात आली होती. एकही व्यवहार हा कोअर बँकिंग सोल्युशन (सीबीएस)च्या माध्यमातून झाला नाही. स्विफ्ट म्हणजे फॅक्स प्रमाणे असतो. सीबीएसशी त्याचं इंटिग्रेशन नसतं. पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे शक्य झाल्याची माहिती आहे.
१२ फेब्रुवारीला पंजाब नॅशनल बँकेकडून ३० बँकांना पत्र पाठवण्यात आलं आणि या घोटाळ्याबाबत सतर्क करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. आरबीआयनुसार एलओयूची मुदत केवळ ९० दिवसांची असते. मात्र भारतीय बँकांच्या परदेशी शाखांनी याकडे कानाडोळा केल्याचं पत्रात म्हटलं आहे.

नीरव मोदी भारतातून परदेशात पळाला
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे.
२८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊट्सद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच रितसर तक्रार केली.

नीरव मोदी कोण आहेत?
नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांना भारतातील ‘डायमंड किंग’ असंही संबोधलं जातं. ४८ वर्षीय नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ८४ व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास १२ हजार कोटींची संपत्ती आहे.
नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची १५ लग्झरी स्टोअर्स आहेत.
नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत १०  लाखांपासून ५० कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘नीरव मोदी डायमंड ब्रँड’ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.

घोटाळा कसा झाला?
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.
लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.
पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला ३ लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास २८० कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. १८ जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता २८० कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.

पीएनबी देशातली पहिली स्वदेशी बँक
१२२ वर्ष जुनी पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. पीएनबीचे एकूण १० कोटी खातेधारक आहेत. तर देशात बँकेच्या एकूण ६९४१ शाखा, ९७५३ एटीएम सेंटर आहेत. पीएनबीचा २०१७ या वर्षातील निव्वळ नफा ९०४ कोटी रुपयांचा आहे आणि एकूण एनपीए ५७ हजार ६३० कोटी रुपये आहे. देशातून फरार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याकडे पीएनबीचं ८१५ कोटींचं कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments