Thursday, March 28, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरकोल्हापूरात महाजनादेश यात्रेकडे छत्रपती संभाजीराजेंची पाठ!

कोल्हापूरात महाजनादेश यात्रेकडे छत्रपती संभाजीराजेंची पाठ!

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सकाळी कोल्हापूर शहरात पोहोचली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह यात्रेचे स्वागत झाले. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे या यात्रेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ही यात्रा भाजपची असल्याने संभाजीराजे सहभागी झाले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फडणवीस हे आज मराठवाडा मुक्ती दिनाचा औरंगाबाद येथील कार्यक्रमास उपस्थित राहून पुन्हा सकाळी यात्रा सुरू केली. कोल्हापुरातील नेते मंडळींनी जोरदार स्वागत केले. भाजपचे स्थानिक खासदार, आमदार या यात्रेत आवर्जून फडणवीस यांच्यासोबत गाडीत बसतात. उपस्थित गर्दीला अभिवादन करत ही यात्रा पुढे जाते.

आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाची अशी ही यात्रा असल्याने सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांना आवर्जून स्थान दिले जाते. अशा यात्रेत संभाजीराजे नसल्याचे चर्चा सुरू झाली.

मराठा साम्राज्याच्या छत्रपतींच्या घराण्यांतील सर्व मंडळी भाजपमध्ये आल्याचा आनंद देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांनी ही बाब आवर्जून मांडली होती. साताऱ्याचे उदयनराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि कागलचे समरजितसिंह घाटगे यांचा नामोल्लेख करून भाजपमध्ये ही सर्व मंडळी असल्याचा उल्लेख केला होता.

साताऱ्याचे दोन्ही राजे काल महाजनादेश यात्रेत उत्साहाने सहभागी झाले होते. दोघांनीही एकत्र काम करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला होता. छत्रपती संभाजीराजे हे या पूर्वीच भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. मी भाजपचा सदस्य नाही, असे राजे अनेकदा सांगतात. त्यामुळे पक्षीय कार्यक्रमाला जाण्याचे टाळतात, असेही त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

भाजपसाठी हे चारही राजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे आहेत. तसा प्रचारही भाजप करीत आहे. तरीही संभाजीराजे नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments