चिल्ड बीअर खिशाला पडणार गरम

- Advertisement -

मुंबई– विकेण्डला किंवा पार्टीजमध्ये बीअर पिऊन चिल आऊट करणाऱ्यांच्या मजेवर थोडं विरजण पडणार आहे. महाराष्ट्रात आजपासून बीअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बीअरच्या किंमतीत सरासरी तीन ते साडेसहा रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. बिअर पिणाऱ्यांच्या खिशाला काही प्रमाणात झळ पोहोचणार आहे.

महाराष्ट्र सरकारने बीअरवरील अबकारी करात २५ ते ३५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे माईल्ड बिअरच्या ३३० मिलीच्या पिंटची किंमत सरासरी तीन रुपये, तर स्ट्राँग बिअरसाठी ४.५० पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. माईल्ड बिअरच्या ६५० मिलीच्या पिंटसाठी पाच रुपये, तर स्ट्राँग बिअरची किंमत ६ रुपये ५० पैशांनी वाढणार आहे. प्रत्येक ब्रँडची बीअर वेगवेगळ्या किंमतीला मिळते. येत्या काही दिवसांतच प्रत्येक ब्रँडचे नवीन दर समजणार आहेत.किंगफिशर, कार्ल्सबर्ग, बडवाईझर या ब्रॅण्डच्या बीअरचे पिंट ६० ते ११० रुपयाला मिळतात. तर बाटलीसाठी ११० ते २३० रुपये मोजावे लागतात.

अबकारी करात वाढ केल्याने बीअरच्या विक्रीतून अबकारी विभागाला मिळणाऱ्या महसुलात सुमारे १५० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. राज्यात वर्षाला ३३ कोटी लिटर बीअरची विक्री होते. गेल्या आर्थिक वर्षात बिअरच्या विक्रीतून १२२८८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षात १४ हजार कोटींचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -