करवीरमध्ये ग्रामंपचायत निवडणूकीत कॉँग्रेसचे वर्चस्व

- Advertisement -

कसबा बावडा/ कोपार्डे:  करवीर तालुक्यात अंत्यत अटीतटीने झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत कॉग्रेसने आपला वरर्चष्मा कायम राखला. प्रतिष्ठेच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत पन्नास पैकी तब्बल बावीस जागा जिंकत अजून तालुक्यात कॉँग्रेस घट्ट असल्याचा इशारा शिवसेना-भाजपला दिला.

सोळा ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली तर पाच शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. पण ज्या ताकदीने भाजपने ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढविल्या होत्या, ते पाहता त्यांच्या पदरात फारसे यश मिळाले नाही. राष्ट्रवादी  पुन्हा अस्तित्वहीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. करवीर तालुक्यातील ११७ पैकी ५० ग्रामपंचायतीसाठी गेले महिनाभर रणधुमाळी सुरू होती. वडणगे, वाकरे, सांगरूळ, उचगाव, पाचगाव, गोकुळ शिरगाव या मोठ्या गावात काट्याची टक्कर पहावयास मिळाली. साम, दाम, दंड या नितीचा सर्रास वापर झाल्याने बड्या नेत्यांना निवडणूकीने घाम फोडला.

सोमवारी अत्यंत चुरशीने ७८ टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा पासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली. प्रथम पोस्टल मते मोजण्यात आली. त्यानंतर सहा फेºयामध्ये ५० गावांची मोजणी करण्यात आली.

- Advertisement -

दक्षिण विधानसभा मतदारसंघात १९ पैकी १३ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी बाजी मारली. भाजपला केवळ कावणे, दिंडनेर्ली, निगवे खालसा, वसगडे या चार ठिकाणी सत्ता मिळवता आली. उर्वरित ठिकाणी अपक्ष व स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली.

करवीर मध्ये ३१ पैकी ९ ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसने वर्चस्व राखले तर पाच ठिकाणी शिवसेनेने कब्जा केला. स्थानिक आघाड्यांचे सरपंच पंधरा ठिकाणी विजयी झाले. परिते येथे राष्ट्रवादीचे आक्काताई सुदाम कारंडे या विजयी झाल्या. निवडणूक नियंत्रक अधिकारी करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे, नायब तहसीलदार एस. ई. सानप यांनी काम पाहिले.

पहिला गुलाल शिवसेनेचा

पहिल्या फेरीत प्रयाग चिखलीसह इतर गावांची मोजणी करण्यात आली. यामध्ये पहिला निकाल प्रयाग चिखलीच्या सरपंच पदाचा लागला. यामध्ये शिवसेनेच्या उमा संभाजी पाटील विजयी झाल्या.

सिग्नल मिळताच एकच जल्लोष

मतमोजणी केंद्रातून निकाल घेऊन बाहेर पडताच समर्थकांना हात वर करून विजयाचा सिंग्नल देत होते. सिंग्नल मिळताच केंद्राबाहेर थांबलेले कार्यकर्ते एकच जल्लोष करत होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी अंगातील कपडे काढून आनंदोत्सव साजरा केला.

सख्या बहिणी विजयी

सांगरुळ मध्ये प्रभाग क्रमांक ५ मधून सविता मगदूम तर प्रभाग क्रमांक ३ मधून अर्चना खाडे या सख्या बहिणी शिवसेना-भाजप आघाडीतून विजयी झाल्या. मांडरेत सरपंच पदाच्या निवडणूकीत अर्चना पाटील यांनी आपली नणंद गुणाताई पाटील यांचा पराभव केला.

सत्यजीत पाटील यांची बाजी

कसबा बीड येथे ‘गोकुळ’ चे संचालक सत्यजीत पाटील यांनी सरपंच पद खेचले तर दुसरे संचालक बाळासाहेब खाडे यांना मात्र सांगरूळ मधील पंधरा वर्षाची सत्ता गमवावी लागली.

गड आला पण सिंह गेला

सावरवाडी, शिंगणापूर, परितेसह तालुक्यात अनेक ठिकाणी बहुमत मिळाले पण सरपंच पद गमवावे लागले. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती पहावयास मिळाली.

दोन ठिकाणी चिठ्ठीचा आधार

शेळकेवाडी, परिते व हसूर दुमाला येथे सदस्य पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने तिथे चिठ्ठीव्दारे विजयी घोषीत करण्यात आले. यामध्ये अनुक्रमे लता महादेव शेळके, अश्विनी सागर पाटील व गीता सर्जेराव सावर्डे या विजयी झाल्या.

विजयी सरपंच असे-

उमा पाटील (चिखली), रंगराव शेळके ( शेळकेवाडी), वंदना चौगले (पासार्डे), अमर कांबळे (भाटणवाडी), सुनिल टिपुगडे (कावणे), मिनाक्षी जाधव (सादळे-मादळे), सुप्रिया वाडकर (हणबरवाडी), सुवर्णा परीट (कांचनवाडी), आक्काताई कारंडे ( परिते), सुवर्णा कारंडे (सावर्डे दुमाला), छाया कांबळे (सडोली दुमाला), ईश्वरा कांबळे (आरळे), मोहन पाटील (सोनाळी), रूपाली मेडसिंगे (कांडगांव), अर्चना पाटील (कंदलगाव), पार्वती चौगले (म्हाळुंगे), अस्मिता कांबळे (नंदवाळ), दिपाली नाईक (नागाव), मंगल जाधव (सावरवाडी), अर्चना पाटील (मांडरे), कविता साहेकर (चुये), सत्यजीत पाटील (कसबा बीड), सिंकदर मुजावर (आंबेवाडी), वसंत तोडकर (वाकरे), दत्तात्रय कांबळे (हिरवडे दुमाला), अनिल मुळीक (दºयाचे वडगाव), उज्वला शिंदे (कणेरी), प्रकाश पाटील (नेर्ली), सदाशिव बाटे (बोलोली), लता कांबळे (जैत्याळ), उत्तम माने (सरनोबतवाडी), पुजा पाटील (हिरवडे खालसा), सुनंदा कुंभार (मोरेवाडी), मंगल कुंभार (दिंडनेर्ली), रमेश कांबळे (भुये), अजित पाटील (हसूर दुमाला), सविता माने (उजळाईवाडी), पांडूरंग महाडेश्वर (निगवे खालसा), शोभा खोत (कणेरीवाडी), सारिका जाधव (दोनवडे), रितू लालवाणी (गांधीनगर), अनिता पाटील (पाडळी बुद्रूक), प्रकाश रोटे (शिंगणापूर), सदाशिव खाडे (सांगरूळ), संग्राम पाटील (पाचगाव), मालूबाई काळे (उचगाव), नेमगोंडा पाटील (वसगडे), युवराज कांबळे (चिंचवडे), सचिन चौगले (वडणगे), महादेव पाटील (गोकुळ शिरगांव).

- Advertisement -