Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeकोंकणठाणेकळव्यात आता फक्त 450 रुपयांमध्ये कोविड ची टेस्ट

कळव्यात आता फक्त 450 रुपयांमध्ये कोविड ची टेस्ट

covid-19, jitendra awhad, dr awhad, kalwa, mumbra, covid testing, rs 400 covid test, milind patil, dr milind patil, dr jitendra awhad

  • डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मिलींद पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
  • एका एक्स रेवर होणार कोरोनाचे निदान
  • अवघ्या पाच मिनिटांत अहवाल
  • कोरानाची टक्केवारीही कळणार

ठाणे: कोविड-19 ची तपासणी महाग असल्याने अनेक गरीबांना ही तपासणी करणे शक्य होत नाही. परिणामी, रुग्णांची अचूक संख्या मिळत नसल्याने कोरोनावर मात करणे अवघड होत असते. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने विकसीत केलेले तंत्रज्ञान आता ठाणे शहरातही आले आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी हा उपक्रम कळवा येथे सुरु केला आहे. अवघ्या साडेचारशे रुपयांमध्ये ही टेस्ट करण्यात येणार असून अवघ्या पाचच मिनिटांमध्ये त्याचा अहवालही मिळत आहे.

सध्या ओमान, दुबई या देशांसह केरळ या राज्यात एक्स-रेद्वारे कोविडची टेस्ट करण्यात येत आहे. तर, नाशिक महानगर पालिकेनेही हे तंत्रज्ञान स्वखर्चाने सुरु केले असून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून एका व्हॅनद्वारे सबंध शहरामध्ये ही चाचणी नाशिक महापालिकेने सुरु केली आहे.

छातीच्या एक्स-रेचा अभ्यास करुन त्याद्वारे शरीरात गेलेल्या कोरोना विषाणू, त्याचे प्रमाण- टक्केवारी आदींची विस्तृत माहिती मिळवणे शक्य होत आहे. नाशिकमधील ईएसडीएस या कंपनीने या संदर्भात संशोधन केले होते. सुमारे 50 हजार लोकांच्या एक्स-रेची तपासणी करुन कोरोनाची चाचणी करण्यात या कंपनीला यश आले आहे. त्यामुळेच सध्या हे केेरळमध्येही वापरण्यात येत आहे. आता हेच तंत्रज्ञान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी कळवा येथे आणले आहे.

छातीचा एक्स- रे काढून त्याद्वारे कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीसाठी अवघा 450 रुपयांचा खर्च होत आहे. विशेष म्हणजे, एखाद्या रुग्णाने बाहेरुन आपला एक्स- रे काढला तरी त्याची तपासणी करुन अवघ्या 200 रुपयांमध्ये ही चाचणी करणे शक्य आहे. या चाचणीमध्ये कोरोनाचे प्रमाण आणि त्यावर रुग्णालयात दाखल करणे किंवा क्वारंटाईन करणे गरजेचे आहे का? याचा अंदाज बांधणे सोपे जात आहे. सध्या लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी प्रतिव्यक्ती सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येत असतो. परंतु एक्स-रे तपासणीद्वारे अवघ्या साडेचारशे रुपयांत अवघ्या पाचच मिनिटांत संभाव्य धोका तपासता येणार आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनात आल्यास केवळ अशा व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. यातून नमुने तपासणीवरील भार कमी होताना दुसरीकडे खर्चातही मोठी बचत होऊ शकेल.

सध्या कळवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या कळवा, खारीगाव, पारसिकनगर, विटावा, गणपतीपाडा येथील रहिवाशांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. कळवा येथील कावेरीसेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ही तपासणी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना आपली चाचणी करुन घ्यायची आहे. अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी 9833342717 / 9137926226 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments