कच्च्या तेलाचा भाव कमी असूनही सर्वसामान्यांच्या खिशावर सरकारचा डल्ला

- Advertisement -

मुंबई – जागतिक बाजारात मध्यंतरी घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा भडका घेतला आहे. परिणामी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी चक्क तीन वर्षातील उच्चांक गाठला. मंगळवारी मुंबईत पेट्रोलची किंमत चक्क ७९.१५ तर डिझेलची किंमत ६५.९० रुपये लिटरवर जाऊन पोहोचली. याच किमती १ ऑक्टोबर २०१४ मध्ये कच्च्या तेलाच्या किमती आजच्या तुलनेत तब्बल २० ते २५ रुपयांनी अधिक असतानाही कमी होत्या. मग आता याच कच्च्या तेलाची किंमत कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का वाढत आहेत? सरकार नागरिकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गेल्या १ ऑक्टोबर २०१४ चा विचार करता, तेव्हा कच्च्या तेलाची किंमत साधारणपणे ९५ डॉलर प्रति बॅरल एवढी होती. मात्र, असे असतानाही मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येकी ७५.७३ आणि ६३.५४ रुपये लिटर एवढीच होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसत आहे. गेल्या ३१ डिसेंबर २०१४ चा विचार करता पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीने प्रती बॅरल ७० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांची चिंता अधिक वाढली आहे. कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहीले तर देशातही पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगणाला भिडल्या शिवाय राहणार नाही. हे वास्तव आहे.
गेल्या सहा महिन्यांचा विचार करता कच्च्या तेलाची किंमत तब्बल ५७ टक्क्यांनी वाढली आहे. असे असले तरी २०१४ चा विचार करता कच्च्या तेलाचे दर आजही कमीच आहे. मात्र तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तेव्हाच्या किमतीच्या तुलनेत प्रति लिटर साधारणपणे ४ रुपयांनी चढेच आहेत. खरे तर तेव्हाच्या आणि आजच्या कच्च्या तेलाच्या किमतीतील तफावत पाहिली तर हे ४ रुपयांनी वाढलेले दर हे फार अधिक आहे. या चढ्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सराकरला पावले उचलणे आवश्यक आहे.

सध्याची परिस्थिती…
जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीची तुलना केली तर आज नागरिकांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत असल्याचे चित्र स्पष्ट होते. थोडक्यात सांगायचे, तर गेल्या ऑक्टोबर २०१४ चा विचार करता १६ जानेवारी २०१८ पर्यंत देशातील दिल्ली, मुंबई, कोलकात्ता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या दिसतात (कोलकात्यातील पेट्रोलची किंमत वगळता). आंतरराष्ट्रीय स्थरावर कच्च्या तेलाची किंमत गेल्या दोन ते तीन वर्षे सलग पडलेली असतानाही आणि आजही १ ऑक्टोबर २०१४ च्या तुलनेत कमीच असतानाही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढतानाच दिसत आहेत.

तुमच्या खिशावर असा पडत आहे डल्ला…
१ ऑक्टोबर २०१४ – जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत साधारणपणे ९५ डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी…
– दिल्ली येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी ६७.८६ आणि ५५.६० रुपये प्रति लिटर.
– मुंबई येथे ७५.७३ आणि ६३.५४ रुपये प्रति लिटर.
– कोलकाता येथे ७५.४६ आणि ६०.३० रुपये प्रति लिटर तर चेन्नई येथे ७०.८७ आणि ५९.२७ रुपये प्रति लिटर, एवढे होते.

- Advertisement -

१६ जानेवारी २०१८ – जागतीक स्तरावर कच्चा तेलाची किंमत साधारणपणे ७० डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी…
– दिल्ली येथे पोट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी ७१.२७ आणि ६१.८८ रुपये प्रति लिटर.
– मुंबई येथे ७९.१५ आणि ६५.९० रुपये प्रति लिटर.
– कोलकाता येथे ७४.०० आणि ६४.५४ रुपये प्रति लिटर.
– चेन्नई येथे ७३.८९ आणि ६५.२३ रुपये प्रति लिटर, एवढे होते.
– २ ऑक्टोबर २०१५ रोजी कच्च्या तेलाची किंमत ४५.५३ डॉलर प्रति बॅरल.
– ३ ऑक्टोबर २०१६ रोजी कच्च्या तेलाची किंमत ४८.१० डॉलर प्रति बॅरल.
– २ ऑक्टोबर २०१७ रोजी कच्चा तेलाची किंमत ५५.३६ डॉलर प्रति बॅरल होती.
तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास २०१५, १६ आणि १७ या वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही आणि १ ऑक्टोबर २०१४ च्या तुलनेत या किमती कमीच असतानाही तुलनेने संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चढ्याच होत्या आणि आजही त्या वाढलेल्याच दिसत आहेत. याचा नाहक भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. सरकार लुटालूटीचा खेळ खेळत आहेत. यामुळे नागरिकांधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -