सरकारच्या लाभार्थी जाहीरातीतून डिजीटल गावाचा दावा फोल!

- Advertisement -

अमरावती – सरकारने स्वत:ची वाह वाह करुन घेण्यासाठी मी लाभार्थी च्या जाहीरातींची फोल खोल झाली. जिल्ह्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव देशातील पहिले डिजीटल गाव असल्याचा राज्य सरकारचा दावा होता. तेथील ग्रामस्थ सध्या गावात मूलभूत सोयी सुविधांसह रोजगार उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत आहे. शासनाच्या ‘मी लाभार्थी’मधील जाहिरातीत दाखविण्यात आलेल्या मनोहर खडके या तरुणाच्याच दुकानात स्वाईप मशिन नाही. शिवाय हरीसालमध्ये इतर डिजीटल सुविधाच अपूर्ण असल्याचे समोर आले.

मेळघाटमधील हरिसाल गाव

अमरावती जिल्ह्यात मेळघाटमधील हरिसाल हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिले आदर्श डिजीटल गाव असल्याचा दावा भाजप सरकारकडून केला जात आहे. तशा जाहिराती देखील मोठ्या स्वरूपात दाखविण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात डिजिटल हरिसालची परिस्थिती काही वेगळीच आहे. गावातील मुख्य जलवाहिनी अनेक दिवसांपासन बंद असल्यामुळे हरिसालकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील २ लहान पाईपलाईनमधूनच पाण्याचा ३ दिवसाआड पुरवठा होतो. त्यामुळे पाण्याची समस्या येथे सर्वात मोठी समस्या आहे.

- Advertisement -

हरिसाल गावातील आरोग्य केंद्र

राज्य सरकारच्या ग्रामविकास योजनेमुळे हरिसाल गावातील शाळा, आरोग्य केंद्र डिजीटल झाल्याचा दावा शासनाकडून ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधून करण्यात येत आहे. मात्र हरिसाल येथील शाळेतील ५० टक्के आदिवासी विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार, वजाबाकी येत नसून कित्येक विद्यार्थ्यांना इंग्रजीत स्वत:चे पूर्ण नाव व पत्ताही लिहिता येत नाही, अशी भयावह सत्य परिस्थिती हरिसालची आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत गावातील आदिवासींना अजूनपर्यंत रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे येथील आदिवासी रोजगाराकरता स्थलांतर करत आहेत. सरकारने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते बंडु साने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

हरिसाल गावातील शाळा

या गावात एका मोबाईल कंपनीचे सोडून अन्य नेटवर्क मिळत नाही. ग्रामपंचायतीचे कामकाज अद्याप कागदोपत्रीच चालते. एकाही दुकानदाराकडे स्वाईप मशीन नाही. दररोज भारनियमन होत असल्याने वायफायचा लाभ कधी घ्यावा हा प्रश्न आहे, तर वायफायचा वेग देखील कमी जास्त आहे. त्यामुळे गाव डिजिटल झाल्याने आपण समाधानी नसल्याचे गावच्या उपसरपंचांनी सांगितले.

सरकारच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मनोहर खडकेचे दुकान

सरकारच्या जाहिरातीत दिसणारा युवक मनोहर खडके हा मुळात हरिसालचा रहिवासी नसून झेरॉक्स, मोबाईल रिचार्ज सेंटरसह दुकानात ऑईल विकण्याचा त्याचा मुख्य व्यवसाय आहे. गावात आर्थिक व्यवस्था सुधारायला हवी नंतर प्रत्येक दुकानदार स्वाईप मशीन लावेल. मशीन लावणे परवडत नसल्याचे त्याने सांगितले.
एकंदरीतच देशातील पहिले डिजीटल गाव असलेल्या गावात राज्य सरकारने आदिवासींना रोजगार उपलब्ध करून द्यावा व टीव्हीत सुरु असणारी जाहिरात बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

- Advertisement -