दिवेआगर दरोडा,दूहेरी खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

- Advertisement -

अलिबाग: दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दोषी ठरवून १२ आरोपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप, तीन महिला आरोपींना १० वर्ष सक्तमजूरी ,दोघांना ९ वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा सोमवारी संध्याकाळी निकाल देताना सुनावली आहे. दरम्यान दोघा आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे.

मृत्यूपर्यंत जन्मठेप  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा झालेल्या पाच जणांमध्ये  नवनाथ विक्रम भोसले(३२,रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (२९, रा.घोसपुरी, अहमदनगर),छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (२५, बिलोणी,औरंगाबाद),विजय उर्फ विज्या बिज्या काळे (२८,श्रीगोंदा,अहमदनगर),  ज्ञानेश्वर विक्र म भोसले (३४,घोसपुरी,अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिता सरकार पक्षाकडून हा खटला चालवणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. दरम्यान १० वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा झालेल्या तिन महिलांमध्ये खैराबाई विक्र म भोसले (५६,घोसपूरी,अहमदनगर),  कविता उर्फ कणी राजू काळे (४४,हिरडगाव,श्रीगोंदा,अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार(५६,श्रीगोंदा,अहमदनगर) यांचा समावेश आहे. दरोड्यात चोरुन आणलेल्या सुवर्ण गणेशाचे सोने घेणारे आनंद अनिल रायमोकर (३८,बेलंवडी,श्रीगोंदा,अहमदनगर) व  अजित अरु ण डहाळे (२८,श्रीगोंदा,अहमदनगर) या दोघा सोनारांना ९ वर्ष सक्तमजूरी  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सूनावली असल्याचे अॅड.पाटील यांनी पूढे सांगीतले.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

श्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -