Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeविदर्भनागपूरकाँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदींची हकालपट्टी!

काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदींची हकालपट्टी!

satish chaturvedi,congress,maharashtra,nagpur,ex minister,india महत्वाचे…
१.पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका
२.प्राथमिक सदस्यत्वही रद्द
३. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी


नागपूर : पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून निष्काषित करण्यात आले आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी या संबंधिचा आदेश जारी करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने संबंधीत आदेश जारी करण्यात आला.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या इतर नेत्यांचेही धाबे दणाणले आहे. तर नागपुरात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची पक्षातील ताकद आणखी वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्ष विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे २५ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला. या अहवालात चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी शहर काँग्रेसला कुणालाही नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद चतुर्वेदी यांनी केला होता. तर कारवाई होवूच शकत नाही, असा छातीठोकपणे दावा चतुर्वेदी यांचे समर्थक करीत होते. मात्र, आता चतुर्वेदी यांना पक्षातून निष्काशित करण्यात आल्यामुळे शहर काँग्रेसने बजावलेली नोटीस ही प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरूनच होती, हे स्पष्ट झाले आहे.

काय होते चतुर्वेदींवर आरोप
नागपूरच्या महापालिका निवडणुकीत पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर शाई  फेकण्यामागेही चतुर्वेदी यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. याशिवाय उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे, उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे, याशिवाय बऱ्याच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला होता.

चतुर्वेदी दिल्लीतही गेले होते
काँग्रेसच्या नोटीसनंतर चतुर्वेदी दिल्ली दरबारी गेले होते. दिल्ली येथे काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र, या प्रकरणात थेट अशोक चव्हाण यांचा हस्तक्षेप असल्यामुळे कुणीही चतुर्वेदींना दिलासा मिळवून देवू शकले नाहीत.

चतुर्वेदींना गटाचे राजकारण अंगलट आले
चतुर्वेदी यांनी नागपुरात गटाचे राजकारण सुरु केले होते. शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होता समर्थकांना घेऊन महात्मा गांधी जयंती, इंदिरा गांधी जयंती आदी कार्यक्रम वेगळे साजरे करण्यावर त्यांचा भर होता. गटातटाच्या राजकारणामुळे त्याचे परिणाम भोगावे लागले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments