Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार हाफिज धत्तूरे यांनी जन्मदिनीच घेतला अखेरचा श्वास

माजी आमदार हाफिज धत्तूरे यांनी जन्मदिनीच घेतला अखेरचा श्वास

मिरज:  मिरजचे माजी आमदार हाफिज धत्तूरे यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. बुधवारीच त्यांचा जन्मदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

हाफिज धत्तूरे मिरज विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. १९९९ आणि २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. सर्वसामान्यांचा आमदार अशी त्यांची ओळख होती. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठवला. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले. स्वच्छ प्रतिमा असलेले नेते म्हणून त्यांना ओळखले जायचे. दोन वेळा आमदार राहुनही त्यांचे राहणीमान साधेच होते. आमदारकीची टर्म संपल्यानंतर त्यांनी बऱ्याचदा रिक्षेतूनही प्रवास केला.

धत्तूरे हे मुळचे बेकरी व्यावसायिक होते. १९९९ मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदारकीचे तिकीट देण्यात आले. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत ते विधानसभेत पोहोचले. धत्तूरे यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी अभिनेते दिलीपकुमार हे मिरजेत आले होते.
धत्तूरे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मिशन रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले: खा. चव्हाण

काँग्रेस नेते व मिरजेचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

हाफिज धत्तुरे यांच्या निधनावर दुःख करताना खा. चव्हाण म्हणाले की, हाफीज धत्तुरे आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. विधानसभा सदस्य म्हणून सांगली व मिरजेच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. साध्या राहणीमुळे आम आदमीचा आमदार अशी त्यांची ओळख होती. आपली आमदारकी पणाला लावून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. हाफीज धत्तुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धत्तुरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments