Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांचा एल्गार: लेखी आश्वासन द्या, मुंबई सोडणार नाही!

शेतकऱ्यांचा एल्गार: लेखी आश्वासन द्या, मुंबई सोडणार नाही!

Long march Mumbaiमहत्वाचे….
१. थोडीशी गद्दारी केली तरी येथेच अन्न सत्याग्रह करू’
२. ६ दिवसापासून शेतकऱ्यांची पायपीट
३. सरकार शेतकऱ्यांच शिष्टमंडळांची आज २ वाजता बैठक


मुंबई: शेतकरी गेल्या ६ दिवस नाशिक ते मुंबईपर्यंत पायी चालून आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख १३ मागण्या आहेत. शेतकऱ्यांशी सरकारने आता टक्केवारीवर बोलणे टाळावे. सरकारने थोडीशी गद्दारी जरी केली तरी याच ठिकाणी अन्न सत्याग्रह करू, जो पर्यंत सरकार लेखी आश्वासन देणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नाही असा इशारा किसान सभेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे सरकार हैराण झाले आहे.

डॉ. अजित नवले म्हणाले, सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी शेतकरी नाशिकहून पायी चालत मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे या सरकारने थोडीशी गद्दारी जरी केली तरी याच ठिकाणी अन्न सत्याग्रह करू. यात जर कुणाला काही झाले तर, त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, जर तोंडाला पाने पुसली तर याद राखा. तसेच आता टक्केवारीवर बोलणे सरकारने टाळावे, असे देखील नवले यांनी सुचवले आहे.
किसान सभेचे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही बैठक दुपारी २ वाजता होणार आहे. विधीमंडळात दुपारी ११ वाजता दिवंगत पतंगराव कदम यांचा शोक प्रस्ताव आणि १२ वाजता राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे या भेटीत बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता फडणवीस सरकार यांच्या निर्णयाकडे आहे.

शेतकऱ्यांच्या १३ प्रमुख मागण्या आणि  १६६ किलोमीटरची पायपीट…

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. या लाँग मार्चमध्ये तब्बल ३० हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे. ६ मार्चला नाशिकहून निघालेला हा मोर्चा १६६ किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले. शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच केल्याने सरकारला गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच धडकी भरली. त्यामुळे सरकार खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. या शिष्टमंडळासमोर आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडून आपल्या मागण्या मांडण्यात येतील. जाणून घेऊयात काय आहेत शेतकऱ्यांच्या १३ प्रमुख मागण्या.

१. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव.
२. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी.
३.  वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा.
४.  बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी.
५. वीज बीलमाफी मिळावी.
६.  ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा.
७.  पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावे.
८.  नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा.
९.  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना.
१०.  कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा.
११. दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा
१२.  साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा
१३. विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments