कंगना विरुध्द फसवणूक आणि कॉपीराइट प्रकरणी गुन्हा दाखल

दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांच्या पुस्तकाची कथा चोरी प्रकरण

- Advertisement -

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंगना आणि रंगोलीसोबतच एकूण चार जणांविरोधात विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

कंगना आणि रंगोलीसोबतच या प्रकरणामध्ये कुमार जैन आणि अक्षय रणौत या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. खार पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या गजानन काब्दुले यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिलीय. आम्ही कंगना आणि इतर चार जणांविरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाच्या तपासासाठी कंगनाला पोलीस स्थानकामध्ये बोलावण्यात येणार असल्याचेही समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिद्दा द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशीष कौल यांनी आपल्या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरुन पाठवली होती.

हेही वाचा: भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा

त्यानंतर काही दिवसांनी याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा कंगनाने ट्विटरवरुन केली. मात्र ही घोषणा करण्याआधी कंगाने या कथेचे मूळ लेखक असणाऱ्या कौल यांची परवानगी घेतली नव्हती.

समोर आलेल्या माहितीनुसार कंगनाने याच वर्षी जानेवारी महिन्यात या चित्रपटासंदर्भातील घोषणा केली होती. त्यानंतर कौल यांनी वांद्रे येथील महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांनी कंगनाबरोबरच तिची बहीण रंगोली, कमल कुमार जैन आणि अक्षय रणौत या तिघांच्या नावांचाही उल्लेख आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सर्व गोष्टीची पडताळणी करुन मुंबई पोलिसांना या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आयपीसी ४०६,४१५,४१८,३४,१२०(ब) आणि कॉपीराइट कायद्याअंतर्गत ५१,६३ आणि ६६ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच चौघांविरोधात समन्स काढून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलवण्यात येईल.

मुंबईमधील वांद्रे पोलीस स्थानकामध्ये कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात सोशल नेटवर्किंगवरुन समाजामध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातही वांद्रे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

- Advertisement -