Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहिला शोषणप्रकरण : भाजपचे माजी आमदार मेहतांची चौकशी करा : नीलम गोऱ्हे

महिला शोषणप्रकरण : भाजपचे माजी आमदार मेहतांची चौकशी करा : नीलम गोऱ्हे

मुंबई : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप पक्षाच्या नगरसेविकेनं केल्यानंतर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या भाजपनं काय कारवाई केली, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. मेहतांची चौकशी करा अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मिरा-भाईंदरमधील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांनी अनेक महिलांचे शोषण केले असून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे सोन्स यांनी सांगितले होते. दुसरीकडे नरेंद्र मेहता यांनी अचानक भाजपमधून बाहेर पडण्याचा तसेच राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. महिलांचे शोषण केल्याच्या आरोपानंतर मिरा-भाईंदरसह राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात आज बुधवारी माध्यमांशी बोलताना ही  प्रतिक्रिया दिली आहे.

मेहता यांची चौकशी झालीच पाहिजे…

पीडित महिलांशी संपर्क साधला आहे. तसंच काल रात्री ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्याशी बोलले आहे. रितसर तक्रार आली नाही, असं त्यांनी मला सांगितल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. पीडित महिलेशी बोलले असता, २ जुलै २०१९ रोजी आपण यासंदर्भात तक्रार केली होती. २०१६ मध्येही नोटरी करून मेहता आपल्याला कशा पद्धतीनं त्रास देत आहेत हे निदर्शनास आणून दिल्याचं संबंधित महिलेनं आपल्याला सांगितल्याचं गोऱ्हे म्हणाल्या. २०१९ रोजी केलेल्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. उलट त्यानंतर मेहता यांनी आपण कसे योग्य आहोत यावर विधिमंडळात भाषण दिल्याचं समजलं. मी या संदर्भात गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. काही महिला आमदारांचेही फोन आले होते. त्यांना दोन्ही सभागृहांमध्ये या विषयावर बोलायचं आहे. मेहता यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली.

भाजपचं मेहतांविरोधात मौन का?…

महिला अत्याचारावरून सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीका केली. महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारविरोधात जो पक्ष आंदोलन करत आहे, त्या भाजपनं अद्याप मौन का बाळगलं आहे? भाजप प्रदेशाध्यक्षांनी मेहता यांच्यावर काय कारवाई केली हे स्पष्ट केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments