Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रगारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार मदत द्या

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार मदत द्या

परभणी: गारपिटीमुळे राज्यभरातील शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतक-यांना प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

परभणी येथे पत्रकारपरिषदेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या विविध भागात झालेल्या गारपीटीमुळे दोन लाख हेक्टरवरील पीकं आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीत सात जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. गारपीट झाल्यावर ४८ तासांत पंचनामे करू असे सरकारने सांगितले पण ७२ तास उलटूनही अद्याप पंचनाम्याला सुरुवात नाही. नेमके किती शेतकरी मेल्यावर या सरकारला जाग येणार आहे? अशी संतप्त विचारणा त्यांनी सरकारला केली.

त्यानंतर परभणी येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, मोठं मोठी आश्वासने देऊन भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली पण सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. सबका साथ सबका विकास अशा घोषणा देऊन मोदींनी सत्ता मिळवली मात्र सत्तेवर आल्यावर भाजपचे खासदार मुस्लीमांनी या देशात राहू नये असे म्हणतात तर केंद्रीय मंत्री संविधान बदलण्याची भाषा करित आहेत. देशातली लोकशाही मोडून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून देशातील महत्त्वाच्या संस्थावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांच्या नियुक्त्या करून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. आश्वासन देऊनही सरकारने शेतीमालाला हमीभाव दिला नाही आता निवडणुका समोर दिसायला लागल्याने मतांसाठी पुन्हा जुमलेबाजी सुरु करून हमीभावाचे आश्वासन देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा देणे आणि भाषणे करण्याशिवाय काहीच करत नाहीत. जनतेला आता सरकारवर विश्वास राहिला नसून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

देशात शाह़तानाशहांचे सरकार …. मोहन प्रकाश

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, देशात शाह-तानाशहांचे सरकार असून हे सरकार फक्त दोन-चार उद्योगपतींच्या हितासाठी काम करित आहे. या सरकारला सर्वसामान्यांचे काही देणे घेणे नाही, अमेरिकन कपंन्यांच्या फायद्यासाठी मोदींनी नोटाबंदी केली. नरेंद्र मोदी परदेशी शक्तींच्या इशा-यावर देशाचा कारभार चालवत असून त्यांना सत्तेवरून दूर केल्याशिवाय या देशातील सर्वसामान्यांचे गरिबांचे कष्टक-यांचे दलित अल्पसंख्याक आदिवासींचे अच्छे दिन येणार नाहीत,  हा संदेश घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनतेपर्यंत जावे असे मोहन प्रकाश म्हणाले.

माजी मंत्री वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील, सुरेश वरपुडकर, आ. डी. पी. सावंत, खा. हुसेन दलवाई, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, माजी आ. उल्हास पवार यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सादरीकरण केले.

यावेळी माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, परभणीच्या महापौर मीनाताई वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, हरिभाऊ शेळके, प्रकाश सोनावणे, पृथ्वीराज साठे, परभणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर माजू लाला, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हरिष रोग्ये, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments