तिसऱ्या प्रयत्नात चोरट्यांनी एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून ६ लाख लांबवले

- Advertisement -

महत्वाचे…
१.एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडले २.एटीएममधून ६ लाख ३८ हजारांची रोकड लंपास ३. आज पहाटे दोनच्या सुमारास घडली घटना


जळगाव  – तरसोद फाट्यावर असलेल्या एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडून लाख ३८ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज च्या पहाटे दोनच्या सुमारास घडली. सुरक्षा रक्षकाचे हात, पाय तोंड बांधून एटीएम मशीन फोडून यातील रक्कम लंपास करून अज्ञात चोरटे पसार झाले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यापूर्वी हा एटीएम दोनदा फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात हा एटीएम फोडण्यात चोरट्यांना यश मिळाले.

एटीएम फोडल्याची माहिती नशिराबाद पोलीसांना कळताच सपोनी आर.टी.धारबडे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी एटीएम रूममध्ये हातपाय, तोंड बांधून ठेवलेल्या सुरक्षा रक्षक हर्षल सुभाष चौधरी या तरूणास बाहेर काढले. यानंतर सुरक्षा रक्षक हर्षल चौधरी याने घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती पोलीसांना दिली. त्याच्या सांगण्यावरून रात्री दोनच्या सुमारास पाच-सहा अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व प्रथम मला मारहाण करत माझे स्वेटर फाडून ते तोंडात कोंबले व हात-पाय नायलॉन दोरीने घट बांधून माझे तोंड भिंतीकडे केले व एटीएम फोडण्यास सुरूवात केल्याचे त्याने सांगितले. हे चोरटे हिंदी भाषीक असून त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशिन फोडले.
श्वानपथक दाखल..

तरसोद फाट्यावरील एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर फोडून त्यातील रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार उघडकीस येताच चोरट्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली. जळगाव येथील श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र या रूममध्ये सर्ंवत्र गॅसचा वास येत होता. यावेळी सिक्युरीटी चौधरी याचा मोबाईल हिसकावून तो चोरट्यांनी बँकेच्या मागे फेकून दिला होता, तो पोलीसांच्या नजरेस पडताच तो श्वानास सुंगवून त्याने एटीएम पासून मुख्य गेटने मार्ग काढत श्वान महामार्गापर्यंत घुटमळले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच चोरटे दिसले मात्र त्यांनी आपले पूर्ण शरीर कापडांनी झाकून घेतले आहे. त्यांतील काहींनी हॉफ पँट घातली असून यात एक वयोवृध्दाचाही समावेश आहे. संपूर्ण शरीर झाकले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. तरीही त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून चोरटे लवकरच हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी वर्तविला आहे.

- Advertisement -

रविवारमुळे होती जास्त रक्कम…
सदर एटीएममध्ये साधारण पाच लाखाच्या आत रक्कम असते. मात्र रविवार सुटीचा दिवस असल्याने यात शुक्रवारीच सहा लाखाच्यावर रक्कम भरलेली होती. ती संपूर्ण रक्कम लंपास झाली असल्याची माहिती बँक मॅनेजर किशोर पटेल व एटीएम एजन्सीने पोलीसांना माहिती दिली.

तिसर्‍यांदा फोडले एटीएम…
हेच एटीएम याअगोदर दोन वेळा फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी मात्र त्यातील रक्कम सुरक्षीत राहिली. पूर्वी याठिकाणी सुरक्षा रक्षकही नव्हते. नशिराबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनी श्री.नेहते व सपोनी राहुल वाघ यांनी बँक, एटीएम याठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्याबाबत पत्रव्यवहार केल्याने याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.
एटीएम मशिन फोडताना अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असले तरी त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलीसांचा कस लागणार आहे. त्यांनी कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची खबरदारी घेतलेली दिसून आले. या चोरट्यांनी रोकड सोबत घेवून जाण्याअगोदर कुठेही फिंगरप्रिंट दिसू नये यासाठी भिंतीवर सर्वत्र पाणी शिंपडलेले आढळून आले.

पोलीसांचा ताफा दाखल…
एटीएम फोडल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी आर.टी.धारबडे, पो.उ.नि.अशोक खरात व त्यांचे सहकारी तत्काळ दाखल झाले. यानंतर त्यांनी वरीष्टांना माहिती देताच याठिकाणी अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील कुराडे, डीवायएसपी एल.एन.तडवी, श्वान पथक आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटनेचा पंचनामा करून याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -