होम महाराष्ट्र आंघोळीच्या पाण्यावरुन सास-याचं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला!

आंघोळीच्या पाण्यावरुन सास-याचं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला!

11
0
शेयर

कोल्हापूर – आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ सावर्डे येथील पन्हाळा तालुक्यातील गावात बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या वादातून सास-यानं चक्क आपल्या सूनेचे कोयत्याने हात तोडल्याने एकच खळबळ उडाली.

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणा-या दोन्ही नातवांवरही त्याने कोयत्यानं वार केले. या घटने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूनेची प्रकृती गंभीर आहे.

मल्हारपेठ-सावर्डे या गावातील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६०) यांनी बुधवारी सकाळी आंघोळीसाठी प्रथम नंबर कुणाचा यावरुन वाद घालत सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३०) हिच्यावर कोयत्यानं वार केला. यात तिचे दोन्ही हात तुटले. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा-या  मयुरेश (वय ९) आणि कनिष्क (वय ४) या दोन नातवांच्या डोक्यावरही पांडुरंग यांनी कोयत्यानं वार केल्याने ते जखमी झाले आहेत. या झटापटीत पांडुरंगदेखील जखमी झाले.
या चौघांनाही उपचारासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिला शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत कळे पोलीस ठाण्यात सासरे पांडुरंग सातपुते यांच्याविरोधात  गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.