मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला

देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

- Advertisement -
bjp-devendra-fadanvis-police-officer-sachin-waze-manuskh-hiren-death-case-updates

bjp-devendra-fadanvis-police-officer-sachin-waze-manuskh-hiren-death-case-updates

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली. “२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर १०.३० वाजता आले. दिवसभर सचिन वझेंसोबत होतो असं मला त्यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घऱी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वझे यांची स्वाक्षरीदेखील आहे,” असं तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वझेंसोबत होते,.

तक्रारीत मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी माझे पती घरी आल्यानंतर ते सचिन वझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरुन वकील गिरी यांच्याकडून पोलीस आणि मीडियामधून फोन येत असल्याची तक्रार करण्यास सांगितलं. माझ्या पतीकडे पोलिसांनी काही मारहाण केली का? काही त्रास दिला का? याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितलं. पण चौकशी झाल्यानंतरही पोलीस वारंवार फोन करत असल्याने तक्रार दिल्याचं सांगितलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

“२०१७ च्या एका खंडणी प्रकरणात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. एकाचं नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव सचिन वझे आहे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. ४० किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे. याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत? २०१ अंतर्गत सचिन वझेंना तात्काळ अटक का नाही? ३०२ तर सोडून द्या…हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही २०१ अंतर्गत अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे उघडकीस आलं आहे,” असंही ते म्हणाले आहेत. सचिन वझेंना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

- Advertisement -